नाशिक - कोरोना विषाणूने महाराष्ट्रात शिरकाव केला असून मुंबई आणि पुण्यात कोरोना व्हायरस बाधित रुग्ण आढळून आल्याने एकाच खळबळ उडाली आहे. त्यामुळे राज्यातील सर्व शहरात आरोग्य विभाग कामाला लागले असून नाशिकमध्ये प्रशासनाने शासकीय आणि महानगरपालिकेच्या रुग्णालयासह शहरातील मोठया खाजगी रुग्णालयामधील आयसोलेटेड बेडवजा कक्ष तयार केले आहे.
नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात आतापर्यंत 6 कोरोना संशयित रुग्ण दाखल झाले होते. यापैकी पाच रुग्णांची कोरोना तपासणी निगेटीव्ह आली आहे. तर, एक रुग्णाची तपासणी अहवाल येणे अद्याप बाकी असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. कोरोना संशयीत रुग्णांसाठी नाशिक महानगरपालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात आयसोलेटेड कक्ष स्थापन करण्यात आला असून ह्यात 16 बेड, जिल्ह्यात शासकीय हॉस्पिटलमध्ये 15, या व्यतिरिक्त वैद्यकिय महाविद्यालयात 10, अशोका मेडिकव्हर रुग्णालयात 1, वोकार्ड रुग्णालय 2, अपोलो रुग्णालय 1, सह्याद्री रुग्णालय 1 बेड असे राखीव ठेवण्यात आले आहेत.
याशिवाय 5 ते 9 मार्च दरम्यान परदेशातून आलेल्या 21 रुग्णांवर पालिकेची नजर असून त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे . चीन,इराण,सिंगापूर,इटली,अमेरिका,दुबई जर्मनी, या देशांचा यात समावेश आहे. परदेशातून आलेले अनेक प्रवासी माहिती लपवत आहे, या पार्श्वभूमीवर प्रवाशाने स्वतः किंवा इतर कोणाला याबाबत माहिती असल्यास नागरिकांनी टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. संबंधित प्रवाशाच्या घरी जाऊन महानगरपालिकेचे आरोग्य कर्मचारी तपासणी करून 14 दिवस देखरेख ठेवणार आहेत. तसेच टोल फ्री क्रमांक 104 वर संर्पक करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
संर्पक क्रमांक पुढील प्रमाणे आहेत -
- जिल्हा शासकीय रुग्णालय - 0253 2572038/2576106
- नाशिक महानगरपालिका - 0253 2317292/2222532
- डॉं झाकीर हुसेन रुग्णालय - 0253-2590049
- जिल्हा साथरोग कक्ष - 9823505085