नाशिक - हनुमान जन्मस्थान असलेल्या अंजनेरी पर्वतावर होणाऱ्या रस्त्याला आता पर्यावरण प्रेमींकडून जोरदार विरोध केला जातोय. वनसंरक्षक विभागाच्या ऑफिससमोर पर्यावरण प्रेमींनी शिट्टी बाजाओ आंदोलन करत इथे होणारा रस्ता रद्द करण्याची मागणी केली आहे.
अंजनेरी पर्वताला दुहेरी महत्त्व
नाशिक शहरापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेल्या अंजनेरी पर्वताला धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्त्व आहे. याठिकाणी श्रीरामांचे निस्सीम भक्त समजल्या जाणाऱ्या हनुमानचा जन्म झाला असल्याने अंजनेरी पर्वताला हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व आहे. तर या पर्वतावर दुर्मिळ पशुपक्षी आणि दुर्मीळ अशा वनस्पती असल्याने याठिकाणी कोणत्याही प्रकारची विकास कामे करण्यात येऊ नये, अशी भूमिका पूर्वीपासूनच पर्यावरण प्रेमींची आहे. मात्र आता शासनाने या ठिकाणी मुळेगाव ते अंजनेरी पर्वतादरम्यान रस्ता बनवण्याचा निर्णय घेतला असल्याने या निर्णयाविरोधात नाशिकमधील पर्यावरण प्रेमींनी एकत्र येऊन शिट्टी बजाओ-शासन प्रशासन जगाओ हे आंदोलन छेडले आहे. हे विकासकामे रद्द करण्यात यावेत यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदनदेखील देण्यात आले.
जैवविवविधतेला धोका
हा रस्ता झाल्यास अंजनेरी पर्वतावर असलेल्या दुर्मीळ वनस्पती, दुर्मीळ पक्ष्यांचा ऱ्हास होईल अशी भीती पर्यवरणप्रेमींकडून व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान नाशिक आणि नाशिकच्या जंगलांवर प्रेम करणाऱ्या नाशिक आणि इतर शहरातील हजारो नागरिकांनी यात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केलीय मात्र कोरोनामुळे अवघ्या पाच पर्यावरण प्रेमींनी एकत्र येत या रस्त्याचे काम रद्द करण्याची मागणी केली आहे.