नाशिक - देशभरात कोरोनाचा कहर सुरू आहे. मालेगावात दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असून मृतांचा आकडादेखील वाढत आहे. गेल्या 24 तासात एकट्या मालेगावात आठ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्यात दिवसभरात 39 नवे रूग्ण आढळले आहेत.
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतांना दिसत आहे. रविवारी सकाळी नाशिक शहरातील सिन्नरफाटा, पाटील नगर येथे 2 आणि मालेगावात नव्याने 21 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर सायंकाळी प्राप्त अहवालात जिल्ह्यातील येवला, दिंडोरी, निफाड, मनमाडसह सटाणा तालुक्यातील ताहाराबाद येथे एकुण 16 रुग्ण कोरोनाबाधित आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
नवीन रुग्णांसह जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 671 वर पोहोचली आहे. तर एकट्या मालेगावातील बाधितांचा आकडा 534 वर पोहोचला आहे. नाशिक शहर 39, नाशिक ग्रामीण 79, इतर जिल्ह्यातील 19 नागरिक नाशिक जिल्ह्यात उपचार घेत असुन आतापर्यंत कोरोनाने 28 जणांचा बळी घेतला आहे. रविवारी सायंकाळी प्राप्त झालेल्या 72 अहवालात 59 अहवाल निगेटिव्ह तर 16 अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
यामध्ये येवला तालुक्यातील पाटोदा गावातील दोघे, गंगा दरवाजा परिसरातील एक तर साईराम कॉलनीतील तिघांचा समावेश आहे. दिंडोरी तालुक्यातील इंदोरे गावातील दोघे तर निळवंडी गावातील 1 रुग्ण आहे. मनमाडमध्येही एका 55 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. तसेच सटाणा शहरात फुलेनगर येथील एका पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली असतानाच आज तालुक्यातील विंचूर प्रकाशा महामार्गावरील ताहाराबाद शहरात पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला आहे. तर निफाड तालुक्यातील पाचोरे बु. येथे 3, मरळगोई येथे 1, तर निमगाव वाकडा येथे 1 रुग्ण आढळून आला आहे.
जिल्ह्यात शहरांसह ग्रामीण भागातही कोरोनाचा संसर्ग पसरला आहे. परिसरातील नागरिकांनी लॉकडाऊनचे नियम पाळून घरातच राहावे, अन्यथा परिस्थिती आणखी गंभीर होण्याची चिन्हे दिसत आहेत.