नाशिक - रुग्णांची फसवणूक आणि सरकारी संस्थेचे आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी मालेगावच्या सिक्स सिग्मा आणि सनराईज या दोन रुग्णालयांवर छावणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हा गुन्हा महानगरपालिकेने दाखल केला आहे. या बाबत माहिती पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिली.
कारवाईत सत्य आले आढळून -
मालेगावच्या सिक्स सिग्मा रुग्णालयांमध्ये बनावट डॉक्टर रुग्णांवर उच्चार करत असल्याचा धक्कादायक प्रकार कृषी मंत्री दादा भुसे यांनी उघडकीस आणला होता. दरम्यान या प्रकरणी सखोल चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश देखील त्यांनी दिले होते. याप्रकरणी कारवाईत सत्य आढळून आल्याने मालेगावच्या सिक्स सिग्मा आणि सनराईज या दोन रुग्णालयांवर फसवणूक आणि सरकारी संस्थेचे आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी मालेगावच्या छावणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालेगाव महापालिकेच्या वतीने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रुग्णालयांनी अग्निशामक प्रतिबंधक परवाना घेतला नसल्याचे वास्तव आले समोर -
बुधवारी मालेगाव महानगर पालिका प्रशासनाने छावणी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे. रुग्णालयाकडून महापालिकेकडे जी कागदपत्र सादर करण्यात आली आहेत, त्यात या रुग्णालयांनी अग्निशामक प्रतिबंधक परवाना घेतला नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. रुग्णालयांनी केलेल्या भाडे करारनाम्यात देखील विसंगती आढळ्या आहेत. याचबरोबर या दोनही रुग्णालयांकडून रुग्णांची आर्थिक पिळवणूक केली जात असल्याचे आरोप सातत्याने रुग्णाच्या नातेवाईकांकडून करण्यात येत होते. यामुळे या दोन्ही रुग्णालयांना मालेगाव महापालिकेने दणका दिला असून मालेगाव महापालिकेने उचललेल्या या पावलामुळे इतर रुग्णालय व्यवस्थापकांचे देखील धाबे दणाणले आहे.