नाशिक - महाविकास आघाडी सरकारच्या महात्मा फुले कर्जमाफी ( Mahatma Fule Loan Waiver Scheme ) योजनेते नाशिक जिल्ह्यात 300 कोटींचा घोटाळा झाला असून जिल्हा बॅकेने हे पैसे लाभार्थ्यांऐवजी थेट मोठ्या खातेदारांना अनियमित पद्धतीने उपलब्ध करुन दिले आहे. या प्रकरणी पालकमंत्री छगन भुजबळ ( Nashik Guardian Minister Chhagan Bhujbal ) यांनी महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांना चौकशीचे आदेश दिले असून हा दोषींवर कारवाईसाठी हा अहवाल राज्यशासनाला पाठवला जाणार आहे.
महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी पहिल्याच अधिवेशनात महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेची घोषणा केली होती. त्या नुसार शेतकर्यांना दोन लाखांपर्यंत कर्जमाफी दिली. नाशिक जिल्ह्यात एक लाख ४६ हजार शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले. राज्य शासनाकडून जिल्ह्याला 900 कोटी तीन टप्प्यात मिळाले. त्यापैकी 600 कोटी कर्जमुक्तीच्या लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले. मात्र, शेवटच्या उर्वरीत टप्प्यातील तीनशे कोटी रुपये जिल्हा बॅकेने लाभार्थ्यांना दिल्याच नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हे पैसे बॅकेंच्या जे मोठे खातेदार आहे, त्यांना कर्ज व इतर स्वरुपात सर्व नियम धाब्यावर बसवत अनियमित वाटप केल्याचा उघडकीस आले आहे. या घोटाळ्याची दखल पालकमंत्री छगन भुजबळ यांनी घेतली असून महसूल आयुक्तांना या सपूर्ण प्रकरणी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
350 कोटी व ट्रॅक्टर लिलाव रडारवर- नोटबंदीच्या काळात जिल्हा बॅकेने 600 कोटी रुपये बदलीसाठी रिझर्व्ह बॅकेकडे पाठवले. मात्र, त्यापैकी 300 कोटींच्या नोटा बदलून देत उर्वरीत 350 कोटींवर रिझर्व्ह बॅकेने आक्षेप घेत नोटा बदलून देण्यास नकार दिला. हा संचालकांचा पैसा असल्याचे बोलले जाते. या प्रकरणाचीही महसूल आयुक्तांनी चौकशी करावी, असे आदेश पालकमंत्री भुजबळांनी दिले. तसेच, ट्रॅक्टर लिलाव प्रक्रियेवर बोट ठेवत नेहमीच्या लिलालधारकांना प्राधान्य दिले जात असून त्याबाबतदेखील पालकमंत्री भुजबळांनी नाराजी व्यक्त केली.
'वीज पुरवठा करण्यासाठी नियोजन करावे' - शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी कृषी मंत्र्याच्या मार्गदर्शनाखाली बांधावर खत व बियाण्यांचा पुरवठा करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या मोहिमेत सातत्य ठेवण्यात यावे. बोगस खते व बियाण्यांचा पुरवठा करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी. तसेच वीज वितरण विभागाने कृषिपंपासाठी शेतकऱ्यांना अखंडीत वीज पुरवठा करण्यासाठी नियोजन करावे. त्याचप्रमाणे वीजेचा सुरळीत पुरवठा होण्यासाठी शेतकऱ्यांनीदेखील वीज देयके वेळेत अदा होतील, यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही भुजबळ यांनी यावेळी केले आहे.