नाशिक - नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा नाशिकच्या पिंपळगाव बसवंत येथे झाली. या सभेदरम्यान मतदारांच्या अंगावर फेकण्यात आलेला फूड पॅकेटचा व्हिडीओ व्हायरल होताच विरोधाकांनी टीकेची झोड उठवली. मोदींच्या सभेत मतदारांवर फूड पॅकेट फेकणे म्हणजे गरिबांची थट्टा असल्याची टीका माजी मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.
लोकशाहीमध्ये मतदार हा राजा असतो, पाच वर्षे मतदारसंघात न येणारे राजकारणी निवडणुकीमध्ये आश्वानाचा भुलभुलैया उभा करून मतदारांना आकर्षित करतात. खऱ्या अर्थाने राजा असणारा हा मतदार अल्पशा मोहाला बळी पडतो. सव्वाशे कोटीहून अधिक लोकसंख्या असलेल्या भारतात तर हा राजा खऱ्या अर्थान औट घटकेचा राजा ठरत आहे. हा अनुभव नाशिकच्या पिंपळगाव बसवंत मुक्कामी झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जाहीर सभेप्रसंगी आला. या अगोदर पंतप्रधान, एवढेच काय राष्ट्रपतींनीही नाशिकवारी केली आहे. पण असा विदारक अनुभव कधी आला नाही, तो यावेळी मतदारांनी अनुभवला.
मोदी येताहेत, पण शेतकरी आंदोलन करतील का? कांदा उत्पादक शेतकरी उत्पादक कंदाफेक करणार तर नाही, विरोधक निदर्शने करणार तर नाही, अशा अनेक गोष्टींची धास्ती भाजपला होती. म्हणून काळे कपडे पण निषेद्ध मानून अनेकांना सभा स्थळावरून परत पाठवण्यात आले होते, पाण्याची बॉटल नेण्याससुद्धा बंदी घालण्यात आली होती. अनेकांना गाडीत भरून आणण्यात आले होते. त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था करणे आयोजकांचे काम होते. पण या मतदार राजाला अक्षरशः लाचार बनवून त्यांच्या अंगावर अन्नाची पाकिटे फेकण्यात आली. हा व्हिडीओ व्हायरल होताच नाशिककर नव्हे तर प्रस्थपितांमधूनही तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. ही संधी साधून भाजपने गरिबांची चेष्टा केल्याची प्रतिक्रिया माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.