नाशिक - औरंगाबादच्या नामांतरावरुन विरोधक महाविकास आघाडीत फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. तसेच नामकरणाच्या मुद्यावर तिन्ही पक्ष एकत्र बसून निर्णय घेतील, असेही त्यांनी म्हटले आहे. नाशिकमध्ये कोरोना संदर्भात घेतलेल्या आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
सूड बुद्धीने कोणी काही करू नये -
'ईडी'कडून सुरु असलेल्या कारवाईबाबत अजित पवारांना विचारले असता, सरकार येत-जात असतात. त्यामुळे सूड बुद्धीने कोणीही काम करू नये. राजकीय हस्तक्षेप न होता कायद्यानुसार कारवाई झाली पाहिजे, असे ते म्हणाले. तसेच काल चार जिल्ह्यात व्हॅक्सीनचा ड्राय रन घेण्यात आला. यादरम्यान, फक्त नंदुरबारच्या एका गावात अडचण आली. सरकार कुणाचे ही असले, तरी लस कोणत्या पक्षाची नाही. शेवटी हा माणसांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे, यामध्ये राजकारण आणू नये, असेही ते म्हणाले.
विकासकामे पूर्ण होणे महत्त्वाचे -
जनतेच्या मनात जे असते तेच होते. मात्र, आम्ही समृद्धी महामार्ग, मेट्रोची कामे सुरूच ठेवली. काम कोणी सुरू केले. यापेक्षा पूर्ण होणे महत्त्वाचे आहे, असा टोला त्यांनी भाजपला लगावला. मराठा आरक्षणाबाबत बोलताना फडणविसांच्या काळातील वकिलांची टीम न्यायालयात बाजू मांडत असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, पार्थ पवारांच्या उमेदवारी संदर्भातही त्यांनी भूमिका स्पष्ट केली. मंगळवेढा मतदारसंघातून पार्थ पवारांच्या उमेदवारीची बातमी धादांत खोटी आहे. भाळकेंच्या जागी पार्थ पवारांचे नाव नसेल. त्यामुळे हा विषय इथे बंद करा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
केंद्राकडून मदतीला विलंब -
कोरोनाच्या काळात इतर विभागांवर जबाबदारी जास्त होती. शेतीच्याही अडचणी होत्या. ऑक्टोबरमध्ये नुकसान झाले आणि केंद्राच पथक डिसेंबरमध्ये पाहणीकरिता आले. त्यामुळे मदत वेळेवर मिळाली नसल्याचा आरोप करत मुख्यमंत्र्यानी तत्काळ 10 हजार कोटींचे पॅकज जाहीर केल्याचे त्यांनी सांगितले. कोरोनाबाबत राज्यात आर्थिक अडचणी येत आहेत. केंद्राकडूनही हवा तसा निधी येत नसल्याने आर्थिक अडचणीत भर पडत असल्याचेही ते म्हणाले.
हेही वाचा - अरुणाचल सीमेवरील फार्वर्ड चौक्यांची सरसेनाध्यक्षांकडून पाहणी