नाशिक - सिन्नर येथील चौदा चौक वाड्यातील सांगळे कॉम्प्लेक्स बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडणाऱ्या सहा संशयितांपैकी पाच जणांना पोलिसांनी 11 तासांत अटक केली आहे. त्यांनी एटीएम फोडण्याच्या घटनेची कबुली दिली आहे. सहापैकी एकजण फरार आहे. दरम्यान, एटीएममधील पैसे काढता न आल्याने त्यातील 10 लाख रुपये सुरक्षित राहिल्याची माहिती पोलिसांनी दिली.
संशयित घोटी महामार्गावरील बंधन लॉन्स परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सापळा रचून ओंकार संजय कांबळे (वय 23 वर्षे, रा. मुंब्रा, ठाणे, हल्ली रा. वंजार गल्ली, सिन्नर), आकाश किशोर खलसे ( वय 20 वर्षे, भीमनगर, भाजीमंडई, पिंपरी-चिंचवड, हल्ली रा. भाटवाडी) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पोलिसांनी दोघांना पोलिसी खाक्या दाखवताच दोघांनी गुन्ह्याची कबूली दिली. त्यानंतर इतर साथीदारांची नावेही सांगितली. त्यानुसार अमोल संजय बोराडे ( वय 20 वर्षे, रा. वाडीवहे, इगतपुरी), अशोक निवृत्ती जाधव (रा. म्हसुली) यांना भोकणी शिवारातील पेट्रोलपंपावरुन ताब्यात घेण्यात आले. त्यांचीही कसून चौकशी केली असता पांडवनगरीत राहणारा नागेश विश्वनाथ वाव्हळ (वय 30 वर्षे) यास अटक करण्यात आली. तर अक्षय निवत्ती जाधव (रा. म्हसुली) याचा शोध पोलीस घेत आहेत. एटीएम फोडण्यासाठी वापरण्यात आलेल्या हत्यारांसह लाल रंगाची कारही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
हेही वाचा - मुंबईत दुकानांमध्ये चोरी करणारी लड्डू गँग जेरबंद
ही कारवाई पोलिस अधीक्षक आरती सिंग, अप्पर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, उपअधीक्षक माधव पडिले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक साहेबराव पाटील यांच्या पथकातील सहायक पोलीस उपनिरीक्षक गणेश परदेशी, भगवान शिंदे, विनोद टिळे, नवनाथ शिरोळे, उल्हास धोंडगे यांचे यांनी केली.
हेही वाचा - राम मंदिरावर काहींची फुटकळ बडबड, मोदींचा सेनेला टोला