ETV Bharat / state

केंद्रीय राखीव पोलीस दलातील असिस्टंट कमांडन्ट नितीन भालेराव अनंतात विलीन - नितीन भालेराव छत्तीसगड सुकमा

असिस्टंट कमांडन्ट नितीन भालेराव यांना छत्तीसगड येथील सुकमा जिल्ह्यात वीरमरण आले. माओवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात देशसेवेचे कर्तव्य बजावताना ते हुतात्मा झाले. भालेराव यांच्यावर सायंकाळी नाशिक शहरातील अमरधाम येथे शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

नाशिक
नाशिक
author img

By

Published : Nov 29, 2020, 10:14 PM IST

नाशिक - भारतीय निमलष्कराच्या केंद्रीय राखीव पोलीस दलात कार्यरत असलेले असिस्टंट कमांडन्ट नितीन भालेराव यांना छत्तीसगड येथील सुकमा जिल्ह्यात वीरमरण आले. माओवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात देशसेवेचे कर्तव्य बजावताना ते हुतात्मा झाले. भालेराव यांच्यावर सायंकाळी नाशिक शहरातील अमरधाम येथे शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

नाशिक

अंत्यसंस्कार स्थळी पार्थिव येताच राज्य शासनाच्या वतीने मंत्री छगन भुजबळ, निमलष्करी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या वतीने महानिरीक्षक संजय लाटकर, नाशिक पोलीस आयुक्तालयातर्फे पोलीस आयुक्त दीपक पांडेय, नाशिक पोलीस परिक्षेत्राच्या वतीने परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर, जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी सूरज मांढरे, ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील आदींनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यानंतर केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तुकडीने बंदुकीच्या फैरी झाडून तसेच अंतिम बिगुल वाजवून असिस्टंट कमांडन्ट नितीन भालेराव यांना अखेरची मानवंदना दिली. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी शहीद नितीन भालेराव यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.

छत्तीसगड येथील सुकमा जिल्ह्यात माओवाद्यांनी

शनिवारी रात्री १० वाजेच्या सुमारास छत्तीसगड येथील सुकमा जिल्ह्यात माओवाद्यांनी ताडमेटला परिसरातल्या बुरकाल येथून ६ किलोमीटर अंतरावर स्फोट घडवून आणला. या स्फोटात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या २०६ कोब्रा बटालियनचे सहायक कमांडन्ट नितीन भालेराव यांना वीरमरण आले.

निफाड तालुक्यातील देवपूर मूळ गाव असलेले नितीन भालेराव हे नाशिक शहरातील राजीवनगर येथे वास्तव्याला होते. त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण नाशिकच्या गोखले एज्युकेशन येथे पूर्ण करून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून केंद्रीय राखीव दलात दाखल झाले होते. २०१० साली केंद्रीय राखीव पोलीस दलात भरती झालेले जवान नितीन भालेराव यांनी सर्वप्रथम जम्मू काश्मीर येथील कुलगाम येथे सेवा बजावली होती. त्यानंतर पंतप्रधान कार्यालयाच्या विशेष संरक्षण पथकामध्ये त्यांनी सेवा दिली होती. त्यानंतर राजस्थानमधील माउंटअबू स्थित 'अंतर्गत सुरक्षा अकादमी' येथे त्यांनी काम केले. जून महिन्यापासून ते २०६ कोब्रा बटालियनमध्ये सहायक कमांडन्ट म्हणून कार्यरत होते. दरम्यान, माओवादी विरोधी कारवाया रोखण्यासाठी त्यांचे विशेष योगदान होते. देशांतर्गत झालेल्या विविध लढाऊ स्पर्धेत हुतात्मा नितीन भालेराव यांनी उत्तम कामगिरी केली होती. नितीन भालेराव यांच्या पश्चात आई भारती, पत्नी रश्मी, मुलगी अन्वी, तर दोन भाऊ अमोल व सुयोग असा परिवार आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.