नाशिक - महानगरपालिका अंतर्गत कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविकांच्या विविध मागण्या मान्य होत नसल्याने भारतीय हितरक्षक सभेच्या वतीने राजीव गांधी भवनासमोर 'जाब विचारा' आंदोलन करण्यात आले. यात अंगणवाडी सेविकांसह भारतीय हितरक्षक सभेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मागील अनेक दिवसांपासून अंगणवाडी सेविका आपल्या विविध मागण्यांसाठी संघर्ष करत आहेत. मात्र अद्यापही त्यांच्या मागण्या मान्य होत नसल्याने महानगरपालिकेबाहेर अंगणवाडी सेविकांना सोबत घेत भारतीय हितरक्षक सभेतर्फे आंदोलन करण्यात आले. यावेळी अंगणवाडी सेविकांच्या विविध मागण्या मांडण्यात आल्या. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.
या आहेत मागण्या -
- अंगणवाडी सेविकांना स्मार्टफोन उपलब्ध करून देण्यात यावा.
- ज्यांना अँपमध्ये माहिती भरणे शक्य नाही, त्यांना ही जबाबदारी देण्यात येऊ नये.
- अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दरमहा हा 10 हजार रुपये मासिक मानधन देण्यात यावे.
- कोरोना सर्वेक्षणासाठी 25 लाखांचा विमा अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी जाहीर करावा.
- महानगरपालिकेतील इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे अंगणवाडी कर्मचार्यांना देखील वार्षिक सुट्ट्या देण्यात याव्यात.
- माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेत अंगणवाडी सेविकांना सर्वेक्षणाचे तांत्रिक आणि आरोग्याच्या दृष्टीने प्रशिक्षण देण्यात यावे.
- त्यांच्या जीवितास धोका होऊ नये म्हणून उत्कृष्ट दर्जाचे सुरक्षा साहित्य महानगरपालिका प्रशासनाने उपलब्ध करुन द्यावे.
- माझे कुटुंब माझी जबाबदारी सर्वेक्षणासाठी मनपा प्रशासनाने अंगणवाडी सेविकांना दीडशे रुपये प्रमाणे मानधन द्यावे.