नाशिक - सत्ताधारी युतीने मागील 5 वर्षात काहीच काम केले आहे. त्यामुळे यंदा मतदार त्यांना धडा शिकवेल. ते आघाडी सरकारला संधी देतील, असे मत खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले. संपूर्ण महाराष्ट्राचं ठरलंय, महाराष्ट्राचे वातावरण फिरलंय, असे म्हणत कोल्हे यांनी मतदार राष्ट्रवादिला निवडून देतील, असा विश्वास व्यक्त केला. अमोल कोल्हे नाशिकमधील आघाडी सरकारच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी नाशिकमध्ये आले असता त्यांनी ईटीव्ही भारतला विशेष मुलाखत दिली.
राज्यासह नाशिक जिल्ह्यातील कांदा, डाळींब, द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची युती सरकारने मागील 5 वर्षांत फसवणूक केली. आर्थिक मंदीमुळे जिल्ह्यातील अनेक कंपन्या बंद पडल्याने मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली. भाजप सरकारने फक्त फसवण्याचे आणि आश्वासनाचे गाजर देण्याचे काम केले, असा आरोप अमोल कोल्हे यांनी केला आहे.
हेही वाचा - मुल्हेर येथील शेकडो वर्षांची परंपरा असलेला ऐतिहासिक रासक्रीडा उत्सव उद्या
जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्याला 2 पैसे मिळत असताना सरकारने निर्यात मूल्य वाढवत कांदा निर्यात बंदी घातली. तर सरकारने पाकिस्तातून कांदा आयात करून तिथल्या शेतकऱ्यांचे भले केल्याचा टोला लगावला. मागील 5 वर्षांत भाजप-सेना सरकारने शेतकऱ्यांच्या हिताची कामे केली असती, तर देशाचा कारभार सोडून महाराष्ट्रतील निवडणुकीसाठी पंतप्रधान आणि देशाच्या गृहमंत्र्यांना प्रचारासाठी येण्याची गरज पडली नसते, असे म्हणत संपूर्ण महाराष्ट्राचे ठरलंय, महाराष्ट्राचं वातावरण फिरलंय, अस म्हणत यंदा परिवर्तन होणार, असा विश्वास कोल्हे यांनी व्यक्त केला.
हेही वाचा - मतदारांनी मत देताना मुख्यमंत्र्यांप्रमाणे तत्वतः निकष लावावा - खासदार डॉ.अमोल कोल्हे