नाशिक - गेल्या दीड ते दोन वर्षांपासून स्मार्ट रोडचे काम रखडल्यामुळे परिसरातील नागरिक, विद्यार्थी यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या रखडलेल्या कामाच्या विरोधात शनिवारी काँग्रेससह विविध संघटनांच्यावतीने मानवी साखळी करून आंदोलन करण्यात आले.
कंत्राटदाराला नोटीस देऊनही संथ गतीने आणि निकृष्ट दर्जाचे काम सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. याशिवाय १७ कोटींचे काम २० कोटींवर विनापरवानगी कसे गेले, असा प्रश्नही नागरिकांनी उपस्थित केला आहे. तसेच स्मार्ट सिटीच्या नावाखाली संचालक मंडळ नाशिककरांकडून पैसे उकळत असून भ्रष्टाचार करत असल्याचा गंभीर आरोप नगरसेवकांनी केला.
या आंदोलनामध्ये अनेक विद्यार्थी देखील सहभागी झाले होते. विशेष म्हणजे प्रशासन अजून किती दिवस वाहन चालकांना आणि परिसरातील रहिवाशांना त्रास देणार असा संतप्त सवाल नगरसेवकांनी उपस्थित केला आहे.