नाशिक : नाशिकमध्ये एक सात महिन्यांची गरोदर माता डॉक्टरांकडे जाण्यासाठी रस्त्यात रिक्षाची वाट बघत होती. यावेळी या गरोदर मातेला अचानक चक्कर आल्याने ती खाली कोसळली. यामध्ये तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. तिच्यासोबत पोटात असलेल्या दोन जुळी अर्भकही मृत पावली आहेत. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
विक्रीकर भवन परिसरातील गजानन आर्केड या इमारतीत वास्तव्य : मिळालेल्या माहितीनुसार, पूजा देवेंद्र मोराणकर (वय 44 वर्ष, पाथर्डी फाटा) असे मृत्यू झालेल्या मातेचे नाव आहे. नाशिकच्या पाथर्डी भागात विक्रीकर भवन परिसरातील गजानन आर्केड या इमारतीमध्ये मोराणकर गेल्या काही महिन्यांपासून वास्तव्यास आहेत. पूजा गर्भवती असल्याने त्यांची काळजी घेण्यासाठी वडील व त्यांची बहीण पुण्याहून तिच्या सासरीच राहत होते. पूजा मोराणकर या गर्भारपणाच्या काळात घ्यायची सर्व काळजी योग्यप्रकारे घेत होत्या. त्या नियमित स्त्री रोगतज्ज्ञांकडे तपासणीसाठी जायच्या. त्या सात महिन्यांच्या गर्भवती होत्या.
गर्भातील जुळ्या अर्भकांचाही दुर्दैवी मृत्यू : पूजा मोरणकर यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे वडील आणि बहिणीने त्यांना डॉक्टरांकडे घेऊन जाण्यासाठी इमारती खालील रस्ता ओलांडून त्या रिक्षाची वाट बघत असताना, पूजा यांना अचानकपणे चक्कर आली आणि त्या जमिनीवर कोसळल्या. यानंतर पूजाला तातडीने नागरिकांच्या मदतीने पाथर्डी फाटा येथील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत झाल्याचे घोषित केले. या घटनेत गर्भातील जुळ्या अर्भकांचाही दुर्दैवी मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेमुळे नाशिकमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
21 वर्षाने घरात हलणार होता पाळणा : मोराणकर कुटुंबीय हे मूळचे धुळे येथील आहे. पती देवेंद्र जगन्नाथ मोराणकर हे खासगी कंपनीत नोकरीला आहेत. पूजा या 21 वर्षांनंतर गर्भवती राहिल्या होत्या. त्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. पूजा या सात महिन्यांच्या गर्भवती होत्या. त्यांना जुळी बाळे होणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. त्यामुळे कुटुंबीय त्यांची खूपच काळजी घेत होते. फारशी हालचाल करू नये, असे डॉक्टरांनी त्यांना सांगितले होते. त्यानुसार पूजा या स्वतःची काळजी घेत होत्या. पण, काळाने त्यांना घेरले आणि एका क्षणातच संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.
शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार : या दुर्दैवी घटनेत मातेसह गर्भवतीसह जुळी बाळेही दगावली. ही घटना घडत नाही तोच वार्ता पाथर्डी फाटा परिसरात वेगाने पसरली. परिसरात पूजा मोराणकर या परिचित असल्याने अनेक नागरिक घटनास्थळी दाखल झाले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पूजा यांच्या पार्थिवावर अतिशय शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी परिसरातील नागरिकांचे मोठ्या संख्येने समाज बांधवदेखील उपस्थित होते.
हेही वाचा : Naresh Maske on Ajit Pawar : नरेश म्हस्केंची अजित पवारांवर खोचक टीका, म्हणाले, 'स्वतःचे ठेवायचे झाकून...