नाशिक - उस्मानाबाद जिल्ह्यात दरोडा टाकून सुरक्षा रक्षकाचा खून करणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीतील मुख्य सूत्रधाराला गजरे विकताना मुंबई नाका पोलिसांनी नाशिकमधून अटक केली आहे. सुनिल काळे, असे त्या म्होरक्याचे नाव आहे.
उस्मानाबादेतील दराेडा, खून प्रकरणात नाशकात उकल
काही दिवसांपूर्वी उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरक्षा रक्षकाचा खून करून घरावर दरोडा टाकण्यात आला होता. यातील संशयितांना पकडण्याचा मोठे आव्हान उस्मानाबाद पोलिसांसमोर उभे असतानाच गुप्त माहितीच्या आधारावर या गुन्ह्यातील मुख्य संशयित नाशिकच्या मुंबई नाका परिसरात गजरे विकत असल्याची माहीती कळंब पोलिसांना मिळाली. त्यांनी याबाबत मुंबई नाका पोलिसांनी कळवले. त्यानंतर मुंब ईनाका पोलिसांनी गजरे विकणाऱ्या एका संशयिताला हॉटेल किनाराजवळून ताब्यात घेतले. त्यानंतर सुनिल काळे याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांनी दिली.
संशयित आरोपी उस्मानाबाद पोलिसांच्या ताब्यात
दरम्यान, संशयित अरुण काळे यांनी गुन्ह्याची कबुली देताच याबाबत कळंब पोलीस ठाण्याला माहिती देऊन सुनिल काळे यांना कळंब पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. मात्र, फुल आणि गजरे विकून आपला उदरनिर्वाह करणारा व्यक्ती दरोडा व हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार निघाल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा - मंत्री आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी, निर्बंध असताना मंदिरात केली होती आरती