दिंडोरी (नाशिक) - नाशिक जिल्हयात वेगवेगळ्या माध्यमातून शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचे प्रकार सुरुच आहेत. दिंडोरी तालुक्यातील ५० ते ६० द्राक्ष उत्पादकांची कोट्यावधींची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्यात सहा व्यापाऱ्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिंडोरी तालुक्यात मोठय़ा प्रमाणावर द्राक्षाचे उत्पादन घेतले जाते. तालुक्यातून परदेशात द्राक्ष निर्यातीचे प्रमाणही अधिक आहे. त्यामुळे परराज्यातील व्यापाऱ्यांकडून द्राक्ष उत्पादकांना फसवण्याच्या घटना कायम होत असतात. दिंडोरी पोलीस ठाण्यात या प्रकरणी शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर गुन्हे दाखल झाले आहेत.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर शेतकऱ्यांनी दिंडोरी पोलीस ठाण्यात संशयितांविरूध्द तक्रार केली. या संपूर्ण प्रकरणात पुणे येथील पाडवा ग्री सोल्युशन्स कंपनीचा भागीदार अमित देशमुख (रा. मध्यप्रदेश), भूषण पवार (रा. देवपूर), विशाल विभुते (रा. धुळे), अमोल चव्हाण (रा. कोथरूड), सागर जगताप (रा. बारामती), संतोष बोराडे (रा. निफाड) अशी या व्यापाऱ्यांची नावे आहेत. याबाबत संबंधित शेतकऱ्यांनी तहसीलदार पंकज पवार व पोलीस निरीक्षक अनंत तारगे यांना निवेदन देवून आरोपींना शिक्षा व शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे. आरोपींना दिंडोरी पोलिसांनी अटक केली असून अधिक तपास पोलिस निरीक्षक अनंत तारगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक कल्पेशकुमार चव्हाण व दिंडोरी पोलीस करत आहेत.