नाशिक - जिल्ह्यात होणारे 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन रद्द झाले नसून ते फक्त स्थगित करण्यात आले आहे. कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येताच संमेलन घेतले जाईल. त्यासाठी दर पंधरा दिवसांनी आढावा घेऊ, असे साहित्य संमेलनाचे कार्यवाहक तथा लोकहितवादी मंडळाचे विश्वस्त हेमंत टकले यांनी स्पष्ट केले. संमेलन आयोजनाचे काम सुरूच राहिल. स्थगितीमुळे मिळालेल्या वेळेत अधिक चांगले आयोजन करू, असा विश्वास देखील टकले यांनी बोलून दाखवला.
कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याने स्थगितीचा निर्णय
नाशिक येथे गोखले एज्युकेशन सोसायटीच्या प्रांगणात होणारे 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, कोरोनाच्या सावटामुळे अनिश्चित कालावधीसाठी स्थगित करण्याचा निर्णय अखिल भारतीय साहित्य परिषदेने औरंगाबाद येथे झालेल्या बैठकीत घेतला आहे. 26 ते 28 मार्च दरम्यान हे साहित्य संमेलन होणार होते. राज्यासह नाशिकमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती साहित्य संमेलनाचे कार्यवाहक आणि लोकहितवादी मंडळाचे कार्यवाहक हेमंत टकले यांनी नाशिक येथील पत्रकार परिषदेत दिली.
हेही वाचा - तर पुन्हा एकदा लॉकडाऊन करणार; जिल्हाधिकारी सूरज मांंढरेंचा इशारा
हेही वाचा - नाशिक : राज ठाकरेंच्या दौऱ्यात चोरीचा प्रकार; पाकिटमाराला कार्यकर्त्यांनी दिला चोप