नाशिक - जिल्ह्यातील कोरोना लसीचा साठा संपल्याने लसीकरण केंद्र बंद पडली होती. मात्र, आज (सोमवार) केंद्राकडून लसीचे 78 हजार 780 डोस नाशिकमध्ये आले आहेत. त्यामुळे थंडावलेल्या लसीकरण प्रक्रियेला गती मिळणार आहे. कोरोना संकटाशी लढणार्या जिल्ह्यासाठी हा मोठा दिलासा ठरला आहे.
जिल्ह्यात अनेक लसीकरण केंद्र बंद -
नाशिक शहर व जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट झाला आहे. रुग्णांना बेड, ऑक्सिजन व रेमडेसिवीर इंजेक्शन मिळेनासे झाले आहेत. त्यात चिंतेची बाब म्हणजे जिल्ह्यात कोरोना लसीचा तुटवडा निर्माण झाला होता. परिणामी लसीकरण प्रक्रिया थंडावली होती. नाशिक शहरात एकूण 52 लसीकरण केंद्र आहेत. त्यापैकी काही केंद्रावर मागील दोन दिवसांपासून लसीकरण बंद होते.
आत्तापर्यंत 6 लाख 20 हजार नागरिकांचे लसीकरण -
शहरासह ग्रामीण भागात देखील लस पुरवठा सुरळीत न झाल्याने लसीकरण मोहीम थंडावली आहे. लसीकरण केंद्रावर लसीकरण बंदचे फलक लावण्यात आले होते. सद्यस्थितीत कोरोना विरुध्दच्या लढाईत लसीकरण हेच प्रमुख अस्त्र आहे. मात्र, त्याचाच तुटवडा असल्याने जिल्हा प्रशासन अडचणीत आले होते. आज जिल्ह्याला 78 हजार 780 डोस प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यातील लसीकरणाचा वेग लक्षात घेता पुढील सहा दिवस ही लस पुरेल. मात्र, पुन्हा वेळेवर लस प्राप्त न झाल्यास लसीकरणावर परिणाम होऊ शकतो. जिल्ह्यात आतापर्यंत 5 लाख 20 हजार नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला तर, 84 हजार 734 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. एकूण 6 लाख 20 हजार डोस नागरिकांना देण्यात आले आहेत.
ज्येष्ठ नागरिक लसीच्या प्रतीक्षेत -
अनेक ठिकाणी लसीकरण केंद्रावर सावळागोंधळ सुरू असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. प्रशासनाचे कुठलेही नियोजन नाही. आम्ही शनिवारी देखील आलो होतो. परंतु लस उपलब्ध नसल्यामुळे परत गेलो. आज पुन्हा चार-पाच तासांपासून आम्ही बसलो आहोत. याठिकाणी लस नसल्याचा बोर्ड लावण्यात आला आहे. कदाचित थोड्या वेळाने तर येईल तेव्हा लसीकरण सुरू करू, अशी उत्तरे मिळत असल्याचे नागरिक रचना कुलकर्णी यांनी सांगितले.
हेही वाचा - दिलासादायक! राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले