नाशिक - कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगाव शहरातील ३ रुग्णांनी कोरोनावर मात केली. आज त्यांना मंसुरा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यामध्ये चांदवडचा एक, तर मालेगावच्या दोन रुग्णांचा समावेश आहे. यामुळे मालेगावकरांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला आहे.
जवळपास २० दिवसांपूर्वी या तीन्ही रुग्णांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना मंसुरा रुग्णालयात दाखल करण्यात आले. २० दिवसांच्या उपचारानंतर त्यांच्या दोन्ही कोरोना चाचण्यांचे अहवाल निगेटिव्ह आले. त्यामुळे आज राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांच्यासह डॉक्टर, मनपा आयुक्त आणि इतर अधिकाऱ्यांनी त्या तीन्ही रुग्णांना टाळ्या वाजवत निरोप दिला. दरम्यान, गेल्या १५ ते १८ दिवसांपासून उपचार सुरू असलेल्या रुग्णांचे अहवाल लवकर प्राप्त व्हावे, जेणेकरून त्यांना देखील आपल्या घरी परतता येईल, अशी मागणी कोरोनामुक्त झालेले रुग्ण म्हणाले.
'ही' बाब अत्यंत दिलासादायक -
आज मालेगावमधील तीन रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, ही अत्यंत दिलासादायक बाब आहे. एकाचवेळी तीन रुग्ण बरे झाल्याने सर्वांचे मनोबल उंचावले आहे. रुग्णांनी वेळेत आरोग्य विभागाशी संपर्क केला असता त्यांना बरे करण्यासाठी आरोग्य यंत्रणा समर्थ आहे, हेच यातून दिसून येते. जनतेने आजपर्यंत प्रशासनाला साथ दिली. आतापर्यंत जवळपास 12 रुग्ण कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर आहेत. यापुढेही जनतेने साथ दिल्यास, लवकरच नाशिक जिल्हा आपण कोरोनामुक्त करू, असा विश्वास जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी व्यक्त केला.