नंदुरबार - नवापूर तालुक्यातील गडदाणी गावाच्या परिसरामध्ये दोन बिबट्यांची निर्घृणपणे शिकार करण्यात आली. विषप्रयोग करून या दोघा नर-मादी बिबट्यांची शिकार झाल्याचा संशय वन विभागाला आहे. याप्रकरणी सहा संशयितांना ताब्यात घेतले आहे. नवापूर तालुक्यातील गडदाणी शिवारात बिबट्यांचा मुक्त संचार आहे. याचा फायदा घेत बिबट्यांची शिकार करून त्यांच्या अवयवांची विक्री केली जात आहे.
शिकार्यांनी कापले बिबट्याचे अवयव -
मांजर कुळातील बिबट्या या प्राण्याच्या कातडीला आणि नखांना मोठी किंमत मिळते. दोन्ही बिबट्यांची शिकार करून त्यांच्या अंगावरची कातडी काढण्यात आली. त्यांचे पंजेही कापून टाकण्यात आले आहेत. विक्रीसाठी पंजे आणि कातडी काढल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
वन विभाग व पोलिसांकडून शोध मोहीम -
या परिसरात अजून काही बिबट्यांची शिकार झाली आहे का? याचा शोध वनविभागाकडून केला जात आहे. त्यासाठी पोलिसांच्या मदतीने विशेष शोधमोहीम राबवली जात आहे. द्वेष भावनेतून या दोन्ही नर-मादी बिबट्यांची शिकार केल्याचा संशय वन विभागाने व्यक्त केला आहे.
सहा संशयित ताब्यात -
याप्रकरणी नवापूर तालुक्यातील सहा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून योग्य ती माहिती काढून मुख्य आरोपींना अटक करण्यासाठी पोलीस व वन विभागाचे कर्मचारी, अधिकारी प्रयत्न करत आहेत.