नंदुरबार - नवापूर तालुक्यातील नागपूर-सुरत राष्ट्रीय महामार्गावर नवरंग रेल्वे गेट रस्त्यावर लोखंडी सळींमुळे ट्रक उलटल्याची घटना घडली आहे. ही घटना सोमवारी सकाळी घडली. ट्रक रेल्वेरुळ सोडून पुढे जाऊन उलटल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.
सुरत-भुसावळ लोहमार्ग नवापूर तालुक्यातुन गेला आहे. नवापूर शहरालगतच नवरंग रेल्वेगेट आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या रेल्वे गेट परिसरातील रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. मोठमोठे खड्डे पडले आहेत. या मार्गावरुन नेहमी अवजड वाहनांची वर्दळ असते. तर रेल्वे क्रॉसिंगमुळे गेट बंद झाल्यावर वाहनांच्या रांगा लागतात. नवरंग रेल्वेगेट परिसरातील रस्त्यावरील लोखंडी सळ्या बाहेर निघाल्या आहेत. यामुळे हा रस्ता वाहनचालकांसह पादचार्यांसाठी धोकेदायक ठरत आहे.
रस्ता काँक्रिटीकरणातील लोखंडी गज बाहेर आल्याने वाहनांचे टायर पंक्चर होत आहे. सोमवारी सकाळी 11च्या दरम्यान रेल्वेगेट ओलांडतांना याठिकाणी ट्रक उलटला. यामुळे काही काळ रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहतूक ठप्प झाली होती. सुदैवाने ट्रक रेल्वेरुळ सोडून पुढे जाऊन उलटल्याने मोठा अनर्थ टळला.
हेही वाचा - पंक्चर झालेल्या वाहनाचे टायर बदलत होते, मग झाले असे...
नवापूर तालुक्यातील कोठडा शिवारातील शेतकरी कुटुंबीय रेल्वेगेटच्या रस्त्याने पायी जात होते. यावेळी एका महिलेचा लोखंडी गजामध्ये पाय अडकल्याने ती लहान बालकासह खाली पडली. यावेळी मागून येणार्या ट्रकचालकाने वेळीच ब्रेक मारल्याने मोठा अनर्थ टळला. गेल्या सहा ते सात महिन्यात नवापूर शहरापासून दोन कि.मी. अंतरावर असलेल्या नवरंग रेल्वेगेटजवळ 7 ते 8 अपघात घडले आहेत. संबंधित विभागाने अपघाताला निमंत्रण देणार्या नवरंग रेल्वेगेट परिसरातील रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी केली जात आहे. अन्यथा महामार्गावर रास्तारोको करण्याचा इशारा, येथील नागरिकांनी दिला आहे.