नंदुरबार - महाराष्ट्र - गुजरात हद्दीवर असलेल्या करोड गावात दोन घरांना भीषण आग लागल्याची घटना मंगळवारी घडली. या आगीत सुमारे सहा लाखांचे नूकसान झाले आहे. या प्रकरणी गुजरातमधील उच्छल पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
उच्छल जवळील करोड गावात पटेलफळीतील रहिवासी निर्मल अमरसिंग पाडवी व दिनेश गुलाब वसावे यांच्या घरात अचानक आग लागली. आग लागताच ग्रामस्थांनी आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. परंतू आगीने रौद्ररुप धारण केल्याने अग्निशमनदलाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. अग्निशमनदलाच्या प्रयत्नाने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. या आगीत सुमारे सहा लाखांचे नूकसान झाल्याचा आंदाज आहे.
मरोड गावातील ग्रामस्थांनी मिळवले आगीवर नियंत्रण
महाराष्ट्र-गुजरात सिमावर्ती भागात महाराष्ट्रात मरोड गाव तर गुजरातमध्ये करोड असे गाव आहे. या दोन गावांमध्ये केवळ एका नदीचे अंतर आहे. करोड गावात आग लागल्याचे कळताच मरोड गावाचे ग्रामस्थ मदतीसाठी धावले होते. या आगीत निर्मल पाडवी व दिनेश वसावे यांच्या घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. अद्याप आगीचे कारण अस्पष्ट आहे.