नंदुरबार -जिल्ह्यात गुरुवारी तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. नाशिक येथे पॉझिटिव्ह आलेल्या नंदुरबार येथील चौघांना आयसीएमआर पोर्टलवरुन नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. यामुळे जिल्ह्यातील आकडेवारीमध्ये 7 रुग्णांची वाढ झाली आहे.
रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालात शहाद्यात 2 व तोरखेड्यातील 1 असे तिघे पॉझिटिव्ह आढळले आहेत. यामुळे जिल्ह्याची कोरोना रूग्णांची आकडेवारी 226 वर पोहोचली आहे.कोरोनामुक्त झाल्यामुळे तिघांना घरी पाठविण्यात आले आहे
नंदुरबार जिल्ह्यात एकीकडे कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत भर पडत आहे. तर दुसरीकडे कोरोनाबाधित रुग्ण संसर्गमुक्त होत आहेत. असे असले तरी दररोज येणार्या अहवालांमध्ये काही अहवाल पॉझिटिव्ह तर काही निगेटिव्ह येत आहेत.
गुरुवारी सकाळी प्राप्त अहवालात तीन जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने ते कोरोनामुक्त झाले. नंदुरबार येथील सिद्धीविनायक चौकातील एक जण, तळोदा येथील खान्देश गल्लीतील एकजण व शहादा येथील गणेश नगरातील एकजण अशा तिघांनी कोरोनावर मात करुन संसर्गमुक्त झाल्याने त्यांना घरी पाठविण्यात आले.
सायंकाळी 23 जणांचे अहवाल प्राप्त झाले, त्यात तीन नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. या बाधितांमध्ये शहादा शहरातील सदाशिव नगरात 42 वर्षीय महिला व मुलबीच नगरातील 20 वर्षीय युवती आणि शहादा तालुक्यातील तोरखेडा येथील 47 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. एकाच दिवशी शहादा शहर व तालुक्यात कोरोनाचे तीन रुग्ण आढळले आहेत.
दरम्यान, नंदुरबार येथील चौधरी गल्लीतील चार जण उपचारासाठी नाशिक येथे गेले होते. त्याठिकाणी त्या चौघांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. या बाधित चौघांना आयसीएमआर पोर्टलवरुन नाशिक येथून नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. बाधितांच्या रूग्णसंख्येत वाढ झाल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 226 वर पोहोचली आहे. त्यापैकी 148 जण संसर्गमुक्त झाले असून 62 रुग्ण उपचार घेत आहे.