नंदुरबार - अश्व पंढरी म्हणून ओळख असणाऱ्या सारंगखेडा येथील चेतक महोत्सवातील शेवटची स्पर्धा संपन्न झाली. घोड्यांच्या रेवाल या प्रकारातील शर्यतीने या स्पर्धांची सांगता झाली. या स्पर्धेसाठी देशभरातील अश्व मालक हजेरी लावत असतात.
यावर्षीच्या चेतक महोत्सवात होणाऱ्या या स्पर्धेसाठी २५ अश्वांनी सहभाग नोंदवला होता. या शर्यतीमध्ये सहभागी झालेल्या घोड्यांना खास प्रशिक्षण दिले जाते. या वर्षीच्या रेवाल शर्यतीमध्ये उत्तरप्रदेशच्या फैजाबाद येथून आलेल्या सरफराज खान यांच्या 'रुस्तम' या अश्वाने पहिला क्रमांक पटकवला. दुसरा क्रमांक उत्तरप्रदेशमधील सुलतान खान यांच्या 'शहंशाह' याने मिळवला. सुरत येथील इक्बालभाई खान यांच्या 'तौमर' या घोड्याने तिसरे बक्षीस मिळवले.
हेही वाचा - सोलापुरात रस्त्याच्या मागणीसाठी अवतरले चक्क यमराज, संभाजी ब्रिगेडचे आंदोलन
या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा महोत्सवाचे आयोजक आणि अध्यक्ष जयपालसिंह रावल यांच्या हस्ते संपन्न झाला. ही शर्यत पाहण्यासाठी दीड किलोमीटर ट्रॅकच्या आजूबाजूला हजारो अश्व शौकिनांनी हजेरी लावली होती. मागील तेरा दिवसांपासून सुरू असलेल्या विविध अश्व स्पर्धांचा समारोप झाला. मात्र, सारंगखेडा येथील घोडे बाजार आजून पाच दिवस चालणार आहे. येथे मोठ्या प्रमाणात घोड्यांची खरेदी व विक्री केली जाते.