नंदुरबार - राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर नंदुरबार जिल्हा दौर्यावर आले असता त्यांनी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात पीडित महिलांच्या तक्रारी ऐकून जनसुनावणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले, की हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील पिडितेने सहन केलेल्या वेदना पाहता आरोपीला न्यायालयाने मरेपर्यंत फाशी द्यायला हवी होती. याबाबत आम्ही पुर्नविचार याचिका दाखल करू, असे त्या म्हणाल्या. यावेळी त्यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर कडाडून टीका केली. चंद्रकांत पाटील बोलतात कमी बरळतात जास्त, अशी टीका रुपाली चाकणकर यांनी केली आहे.
महिला आयोग आपल्या दारी उपक्रमातंर्गत पार पडली जन सुनावणी
महिलांवरील अन्याय, अत्याचार रोखून त्यांच्या सुरक्षिततेला महिला आयोग प्राधान्य देत आहे. त्यासाठीच जिल्हास्तरावर जनसुनावणीचे आयोजन करण्यात येत आहे. या सुनावणीच्या माध्यमातून पीडित महिलांना न्याय देण्याचा आयोगाचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केले आहे. बालविवाह रोखण्यासाठी कठोर कारवाई करावी. ज्या ग्रामपंचायत हद्दीत बाल विवाह होईल व त्यांची वयाची खोटी नोंद आढळून आल्यास त्या सरपंचावर व नोंदणी अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्यासाठी लोकप्रतिनिधींचे सहकार्य घ्यावे. विवाह नोंदणीसाठी नियुक्त प्रशासकीय अधिकाऱ्यांनीही आपापल्या भागात बालविवाह होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. बालविवाह प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी केली जावी, असेही त्या म्हणाल्या. तसेच मनोधैर्य योजना, मिशन वात्सल्य योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहनही त्यांनी केले.
जिल्हा रुग्णालयात तृतीयपंथीसाठी स्वतंत्र्य वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याच्या सूचना
तृतीयपंथीयाना कोरोना काळात वैद्यकीय सुविधा मिळताना अडचणी येत होत्या, म्हणून राज्य महिला आयोगाने प्रत्येक जिल्ह्यात तृतीयपंथीयासाठी स्वंतत्र वैद्यकीय यंत्रणा उभारण्याची सूचना केली. त्याचबरोबर महिलांवर अन्याय अत्याचार होणार नाही तसेच बालविवाह होणार नाही याकरीता तसेच अनिष्ठ रुढी, परंपरा यांच्याविरोधात सामाजिक संस्थांनी पुढाकार घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. महिलांची सुरक्षितता, त्यांचेवरील अन्याय अत्याचार रोखणे, पिडीतांना न्याय मिळवून देणे हे आयोगाचे काम असल्याचेही त्यांनी यावेळी सागितले.
जनसुनावणीसाठी दोन पॅनल गठित
जनासुनावणीसाठी दोन पॅनल गठित करण्यात आले होते. यात पोलीस अधिकारी, संरक्षण अधिकारी, विधी तज्ञ तसेच स्वत: आयोगाच्या अध्यक्षा, सदस्य व सदस्य सचिव यांचाही समावेश होता. यावेळी जनसुनावणीसाठी 50 अर्ज प्राप्त झाले होते. यावेळी भरोसा सेलच्या माध्यमातून दोन कुटूंबामध्ये जागेवरच तोडगा काढण्यात आला. महिलाच्या अत्याचार रोखण्यासाठी ग्रामीण भागासाठी 112 तर शहरी भागासाठी 1091 तसेच चाईल्ड हेल्पलाईनसाठी 1098 हा हेल्पलाईन क्रमांक सुरु असून याचा संबधितांनी लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
'हिंगणघाट जळीत प्रकरणात पुर्नविचार याचिका दाखल करणार'
हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील पिडितेन सहन केलेल्या वेदना पाहता आरोपीला न्यायालयाने मरेपर्यत फाशी द्यायला हवी होती. राज्य महिला आयोगांने तशी मागणी गृहमंत्र्यांकडे देखील केली होती. आता न्यायालयाचा निकाल हाती आल्यानंतर महिला आयोगाच्या वतीने राज्य शासनाला यातील आरोपीला मरेपर्यंत फाशीसाठी पुर्नविचार याचीका दाखल करण्याची मागणी केली जाणार आहे, अशी प्रतिक्रिया निकालानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली आहे.
'चंद्रकात दादा बोलतात कमी बरळता जास्त'
राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष तथा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर सडकुन टिका केली आहे. चंद्रकात दादा बोलतात कमी बरळता जास्त, असे बोलत जेव्हा बौद्धीक विचार करुन विरोध करता येत नाही, समोरच्या व्यक्तिला उत्तर देता येत नाही. त्यावेळी घरच्या व्यक्तींवर उतरायचे ही भाजपाची संस्कृती आणि परंपरा चंद्रकांत दादांनी पाळली आहे. चंद्रकांत दादा आणि लॉजीकचा संबंधच नाही. त्यांच्या हातात असलेल्या वेळेचा सदुपयोग करावा आपल्या बुद्धीचा आवाका वाढवा, त्यांनी माझ्या पत्रकार परिषद निट ऐकून काय विचारले आणि काय बोलले हे निट एकावे, अशी सडकुन टिका देखील चाकणकर यांनी केली.
'महाराष्ट्रात अशी विकृती सहन केली जाणार नाही'
बुरखा परिधान केला म्हणून ज्या पद्धतीने कर्नाटकमध्ये एका महिलेला वर्तणूक मिळाली ही विकृती असुन आम्ही महाराष्ट्रात अशी विकृती सहन केली नसती, अशी प्रतिक्रिया रुपाली चाकणकर यांनी दिली आहे. मुस्लिम महिलांना त्यांच्या रीती रिवाजाप्रमाणे जगता आले पाहिजे, अशा पद्धतीची घटना महाराष्ट्रात घडणार नाही याची आम्ही काळजी घेऊ आणि घडली तर संबंधितांवर कारवाई करू, असे यावेळी रुपाली चाकणकरांनी सांगितले. कोरोना काळात महाराष्ट्र सरकार अडचणीत असतांना विरोधकांनी केंद्राकडे याबाबत कुठल्याही मागण्या केली नाही उलट राजकारण केल नाही. महाराष्ट्राबाबत केंद्राची नेहमीच दुय्यम वागणुक असते. त्यामुळे ज्या पद्धतीने केंद्र वागत आहे, महाराष्ट्राचा अपमान करत आहे. या साऱ्या बाबी लक्षात घेवून महाराष्ट्रीयन माणून त्यांना त्यांची जागा दाखवून देईल, असा त्यांनी केंद्रावर देखील निशाना साधला.