नंदुरबार - जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा मंगळवारी जिल्हा परिषदेच्या सभागृहात संपन्न झाली. तसेच या बैठकीत विषय समितीच्या सभापतींचे खातेवाटप संपन्न झाले. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अॅड. सीमा वळवी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ही बैठक वादळी ठरली.
या सभेत करण्यात आलेल्या खातेवाटपानुसार उपाध्यक्ष राम रघुवंशी यांच्याकडे पशुसंवर्धन आणि कृषी खात्याची जबाबदारी देण्यात आली. तर अभिजीत पाटील यांच्याकडे बांधकाम आणि अर्थ खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली. जयश्री पटेल यांच्याकडे शिक्षण विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.
हेही वाचा... मेरी जान 'तिरंगा' है! राष्ट्रध्वजाच्या सन्मानासाठी 'त्याने' लावली जीवाची बाजी
यावेळी भाजपच्या सदस्या अर्चना गावित व राजश्री गावित यांनी जिल्हा परिषदेतील उपाध्यक्ष कार्यालयातील भिंत तोडल्याचा मुद्दा मांडला. उपाध्यक्ष कार्यालयाची भिंत का तोडण्यात आली, कोणाच्या परवानगी तोडण्यात आली? याविषयी आक्रमकपणे भूमिका मांडून चौकशी करण्याची मागणी त्यांनी यावेळी सभागृहाकडे केली.
बेकायदेशीरपणे भिंत तोडल्याबाबत चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन दिले आहे. तरी अद्याप कार्यवाही होत नाही, यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी व संबंधित अधिकार्यांनी उत्तर द्यावे, अशी मागणी दोन्ही सदस्यांनी लावून धरली. अखेर पुढील सभेपर्यंत चौकशी पूर्ण करुन कारवाईची माहिती देण्याचे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी दिले.