नंदुरबार - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष सागर तांबोळी यांनी भारतीय जनता पक्षात आपल्या कार्यकर्त्यांसह प्रवेश केला आहे. राष्ट्रीय प्रवक्त्या खासदार डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत यांनी भाजपात प्रवेश केला. सागर तांबोळी यांनी भाजपातर्फे शनिमांडळ गटातून आपल्या पत्नीचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी भाजपात प्रवेश केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात खळबळ उडाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार -
नंदुरबार जिल्हा परिषदेतील ११ रिक्त जागांच्या नामनिर्देशन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी आज जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष सागर तांबोळी यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम केले आहे.
भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या खासदार डॉ. हिना गावित शनिमांडळ गटातून भाजपातून उमेदवारी -शनिमांडळ गटातून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून लढलेल्या सागर तांबोळी यांचा साडेचारशे मतांनी पराभव झाला होता. मात्र त्यांनी आज अचानक राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश आहेत. यानंतर त्यांनी शनिमांडळ गटातून आपल्या पत्नीचा उमेदवारी अर्ज देखील भाजपाकडुन दाखल केला आहे. गेली अनेक वर्षे युवक आणि आता कार्याध्यक्षाच्या माध्यमातून सागर तांबोळी हे राष्ट्रवादीची धुरा सांभाळत होते. मात्र ऐन सत्तेच्या काळात त्यांच्या या निर्णयाबाबत आता चर्चांना उधाण देखील आले आहे.
खा. हिना गावित यांच्या उपस्थितीत प्रवेश -
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष सागर तांबोळी यांनी भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या खासदार डॉ. हिना गावित, भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्या उपस्थितीत आज भाजपात प्रवेश केला. त्यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केला आहे.