नंदुरबार - आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने राज्यातील पेसा क्षेत्रातील शेतमालाची खरेदी केली जाते. मात्र यंदा आदिवासी विकास महामंडळाकडून मका खरेदी थांबवण्यात आली आहे. त्यामुळे हजारो टन मका उघड्यावर पडून आहे. मका उघड्यावर टाकण्यात आल्याने मोठ्या नुकसानाची शक्यता आहे. शिवाय, मका खरेदी बंद असल्याने, व्यापाऱ्यांना कमी दरामध्ये मका विकण्याची शेतकऱ्यांवर वेळ आली आहे.
बारदान उपलब्ध नसल्याने खरेदी रखडली
आदिवासी विकास महामंडळाच्यावतीने राज्यातील पेसा क्षेत्रातील शेतमालाची खरेदी केली जाते. मात्र यावर्षी आदिवासी विकास महामंडळाकडून धान्याच्या खरेदीला सुरुवात करण्यात आलेली नाही. त्यासाठी आदिवासी विकास महामंडळाच्यावतीने बारदान नसल्याचे कारण पुढे केले जात आहे. तर दुसरीकडे, नाफेडने देखील हमीभावाने मका खरेदीला नकार दिला आहे.
मका उघड्यावर पडली असल्याने नुकसान होण्याची शक्यता
आदिवासी विकास महामंडळाकडून खरेदी सुरू नसल्याने, हजारो टन मका उघड्यावर पडला आहे. दुसरीकडे, हवामान विभागाकडून जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पाऊस पडल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. या नुकसानाची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
लवकरच मकाच्या खरेदीला सुरुवात करू
राज्याचे आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी यांना मका खरेदी संदर्भात विचारले असता. यासंदर्भात बैठक घेण्यात येणार असून, त्यानंतर तातडीने बारदानची व्यवस्था केली जाईल व मका खरेदीला सुरुवात करू, अशी माहिती त्यांनी दिली.