नंदुरबार - जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारतोफा रविवारी रात्री 10 वाजता थंडावल्या. जिल्हा परिषदेच्या 56 गटातील 225 उमेदवार तर 6 पंचायत समितीच्या 112 गणातील 369 उमेदवार यावेळी रिंगणात आहेत. 7 जानेवारीली ही मतदान प्रक्रिया घेण्यात येणार आहे.
या निवडणुकीसाठी जिल्ह्यात 1 हजार 229 मतदान केंद्र असून 10 लाख 4 हजार 873 इतके मतदार आहेत. मंगळवारी मतदान प्रक्रिया असल्याने तालुकानिहाय तहसिल कार्यालयातून नियुक्त मतदान अधिकारी, कर्मचारी मतदान यंत्रे घेवून आपापल्या केंद्रांवर रवाना होणार आहेत.
हेही वाचा - केंद्र सरकारच्या पाठबळामुळेच जेएनयूमधील विद्यार्थ्यांवर भ्याड हल्ला - मेधा पाटकर
नंदुरबार जिल्हा परिषद व 6 पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी गेल्या महिन्याभरापासून सुरू आहे. अनेक गट व गणातील लढती प्रतिष्ठेच्या ठरल्या असून याठिकाणी प्रचाराचा धुराळा उडाला. नंदुरबार जिल्ह्यात गट व गण मिळून 415 उमेदवार आपले राजकीय भवितव्य आजमावत आहेत.
प्रशासनाने मतदान प्रक्रियेसाठी 1 हजार 229 मतदान केंद्र तयार केले आहेत. यात अक्कलकुवा तालुक्यात 10 गट व 20 गणांसाठी 205 मतदान केंद्र असून 1 लाख 53 हजार 604 मतदार आहेत. अक्राणी तालुक्यात 7 गट व 14 गणांसाठी 149 मतदान केंद्र असून 1 लाख 17 हजार 638 मतदार आहेत. तळोदा तालुक्यात 5 गट व 10 गणांसाठी 111 मतदान केंद्र तर 97 हजार 433 मतदार आहेत.
हेही वाचा - 'फडणवीस सरकारने राज्याच्या डोक्यावर ७ लाख कोटींचे कर्ज ठेवले'
शहादा तालुक्यात 14 गट व 28 गणांसाठी 308 मतदान केंद्र असून 2 लाख 51 हजार 176 मतदार आहेत. नंदुरबार तालुक्यात 10 गट व 20 गणांसाठी 224 मतदान केंद्र तर 1 लाख 98 हजार 295 मतदार आहेत. नवापूर तालुक्यात 10 गट व 20 गणांसाठी 232 मतदान केंद्र असून 1 लाख 86 हजार 726 मतदार आहेत. मतदान प्रक्रियेसाठी 6 हजार 800 कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, 8 जानेवारीला मतमोजणी प्रक्रिया होणार आहे. या निवडणुकीसाठी मतदान केंद्रासह परिसरात जिल्हा पोलीस दलातर्फे कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.