नंदुरबार - आदिवासीबहुल असलेला नंदुरबार जिल्हा कुपोषणासाठी नेहमीच चर्चेत राहिला आहे. कोरोना काळात जिल्ह्यातील अतिशय महत्त्वाचा व गांभीर्याचा प्रश्न असलेल्या कुपोषणाकडे जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. याचाच परिणाम म्हणून गेल्या वर्षीच्या तुलनेत नंदुरबारमध्ये कुपोषणाचे प्रमाण वाढले आहे. दुसरीकडे कोरोनाच्या भीतीपोटी आदिवासी पालक आपल्या मुलांना पोषण पुर्नवसन केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यास घाबरत असल्याची भयावह स्थिती आहे. त्यामुळेच पावसाळ्यात कुपोषणाची स्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात कुपोषणाचा प्रश्न मोठा आहे. यामुळेच जिल्हा प्रशासनाकडून बालकांचे कुपोषण दूर करण्यासाठी विविध योजना राबवण्यात येतात. आदिवासीबहुल भाग असलेला नंदुरबार जिल्हा नेहमीच कुपोषणासाठी राज्यात कुप्रसिद्ध राहीला आहे. मात्र कोराना काळात तर कुपोषणाची स्थिती आणखी गंभीर होताना दिसत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कुपोषितांचा आकडा हा तब्बल 2508 ने वाढला आहे. नंदुरबारमध्ये एप्रिल अखेरीस 9421बालके कुपोषित आहेत. त्यातील 8921 बालके ही मॅम श्रेणीतील तर 908 बालक ही सॅम म्हणजे तीव्र स्वरुपातल्या कुपोषित श्रेणीतील आहे. मागच्या एप्रिलमध्ये कपोषिंताचा हाच आकडा 6921 इतका होता. त्यामुळेच वर्षभरात कुपोषणाचे प्रमाण वाढल्याचं चित्र आहे. असे असले तरी दुसरीकडे मात्र तीव्र कुपोषित बालकांच्या पोषण आणि उपचारासाठी तयार करण्यात आलेल्या पोषण पुर्नवसन केंद्राकडे आदिवासी पालकांनी पाठ फिरवली आहे.
कोरोनाच्या भीतीमुळे पोषण केंद्रातल्या बालकांमध्ये घट
कोरोनाच्या भीतीमुळे पालक आपल्या बालकांना पोषण केंद्रांमध्ये घेऊनच येत नाहीत. त्यामुळे पोषण केंद्रे ओस पडली आहेत. जिल्ह्यातील प्रमुख पोषण पुर्नवसन केंद्र असलेल्या अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयातील पोषण केंद्रामध्ये सध्या एकही कुपोषित बालक नसल्याचे चित्र आहे. अक्कलकुवा प्रमाणेच दुर्गम भागातील, मोलगी, धडगाव, तळोदा येथील पोषण पुर्नवसन केंद्राची अवस्था आहे. पोषण केंद्रांमध्ये बालके नसल्याने यातील अनेक केंद्रांमध्ये लसीकरण कॅम्प सुरू करण्यात आले आहेत. गेल्या वर्षी कोरोनाच्या लाटेत पोषण केंद्रांमध्ये बालकाची गर्दी कायम होती. मात्र यंदा आदिवासी पालकांनी पोषण केंद्राकडे पाठ फिरवली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाती पोषण केंद्रामध्ये केवळ 3 बालके दाखल आहेत. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात कुपोषणाची स्थिती भयावह होण्याची भीती डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.
1144 बालकांवर घरीच उपचार
खर तर तीव्र कुपोषित मुलांना 'एनआरसी'मध्ये दाखल करण्याची जबाबदारी ही अंगणवाडी सेविकांवर असते. मात्र कोरोना काळात आजुबाजुला कोरोना विलगीकरण कक्ष असल्याने, आपल्या मुलांना पोषण केंद्रामध्ये ठेवण्यास पालक तयार होताना दिसत नाही. त्यामुळे सध्या 748 व्हीसीटीसीच्या माध्यमातून 1144 बालकांवर घरीच उपचार सुरू आहेत, अशी माहिती महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. आणि एखाद्या बालकाची जर तीव्र कुपोषणाकडे वाटचाल झाल्यास त्याला तात्काळ पोषण केंद्रामध्ये दाखल करण्याच्या सूचनाही महिला व बालविकास विभागाच्या वतीने देण्यात आल्या आहेत.
हेही वाचा - ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आणण्याचे पाप महाविकास आघाडीने केले - देवेंद्र फडणवीस