नंदुरबार : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नंदुरबार पथकाने नवापूर तालुक्यातील रायपूर गावात सापळा रचून 22 लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त केला आहे. यासह पोलिसांनी मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनाला देखील जप्त केले आहे. जप्त केलेल्या एकूण मुद्देमालाची किंमत जवळपास 30 लाख 66 हजार रुपये इतकी आहे. या मद्य तस्करीतील 4 जण फरार झाले असून 2 जणांना अटक करण्यात आली आहे.
दोघांना अटक 4 फरार : नवापूर तालुक्यातील रायपूर मार्गे गुजरातमध्ये मद्याची वाहतूक होत असल्याची माहिती नंदुरबार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मिळाली होती. त्यानंतर पथकाने नवापूर ते चरणमाळ रस्त्यावरील ऊसाच्या शेतात सापळा रचला. पोलिसांनी येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी केली. तपासणीत एका वाहनात रॉयल स्पेशल प्रिमियर व्हिस्की 180 मिली क्षमतेच्या दारुचे 116 खोके, इम्पेरीअल ब्ल्यू व्हिस्की 180 मिली 90 खोके, ऑल सिझन व्हिस्की 750 मिली 29 खोके, हायवर्ड 5000 बिअर 500 मिलीचे 80 खोके, मॅजिक मुव्हमेंट व्होडका 750 मिलीचे 23 खोके, रॉयल चॅलेंज व्हीस्कीचे 750 मिलीचे 17 खोके असे एकुण 355 खोके असलेला मद्यसाठा जप्त केला. याची किंमत सुमारे 22 लाख आहे. या प्रकरणी धनराज कौतिक पाटील (रा. उमंड, ता. साक्री), बिभीषण रामलाल सोनवणे (रा. कावठी) या दोघांना अटक करण्यात आली असून उर्वरीत 4 जण फरार आहेत.
पुढील तपास सुरु : ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभाग मुंबईचे आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी, संचालक सुनिल चव्हाण, नाशिकचे विभागीय आयुक्त डॉ. बी. एच. तडवी, नंदुरबारचे अधिक्षक स्नेहा सराफ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. नंदुरबार राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक प्रशांत पाटील, एस. आर. नजन, जवान हंसराज चौधरी, भूषण चौधरी, अजय रायते, सहाय्यक दुय्यम निरीक्षक मोहन पवार, नवापूर पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार दिनेश वसुल, पोकॉ. आबा खैरनार हे या पथकात शामिल होते. दुय्यम निरीक्षक प्रशांत पाटील पुढील तपास करत आहेत.
हेही वाचा :