नंदुरबार - नवापूर तालुक्यातील कुंभारपाडा गावात माजी सभापती रतिलाल गावित यांच्या घराला अचानक आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आग नेमकी कशामुळे लागली, हे अद्याप अस्पष्ट आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच नवापूर नगरपालिकेचे अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाने आगीवर नियंत्रण मिळवले आहे. या घटनेची विसरवाडी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
विसरवाडीपासून काही अंतरावर असलेल्या कुंभार पाडा येथे माजी सभापती रतिलाल गावित यांचे दोन मजली कौलारू घर आहे. खालच्या मजल्यावर गुरांचा गोठा आणि गुरांसाठी लागणारा चारा ठेवण्यात आला होता. तर दुसर्या बाजूला रेशन दुकान आहे. चाऱ्याला अचानक आग लागल्याने आगीने उग्ररूप धारण केले. या आगीत गावित यांचे मोठे नुकसान झाले आहे.
ग्रामस्थांच्या सतर्कतेने आगीवर नियंत्रण
आग लागल्याची घटना कळताच ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. ग्रामस्थांनी आगीवर पाण्याचा मारा करत नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. आग अटोक्यात आल्याने मोठा अनर्थ टळला.
आगीत लाखोंचे नुकसान
या आगीत रतिलाल गावित यांच्या घरातील संसार उपयोगी साहित्य आणि रोख रक्कम जळून खाक झाली आहे. गोठ्यात ठेवलेला चारा देखील जळाला आहे. तसेच रेशन दुकानातील कागदपत्रे देखील जळाली आहेत.
होही वाचा - प्रवाशांना कोरोना चाचणी बंधनकारक, मुंबई महापालिकेचे एअरपोर्ट प्रशासनाला पत्र
होही वाचा - जालन्यात भाजयुमोकडून ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन