नंदुरबार - नवापूर तालुक्यातील खांडबारा येथील किराणा दुकानाच्या गोदामात जवळपास साडेचार लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने केलल्या या कारवाईत व्यापार्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
राज्यात गुटखा बंदी असल्याने गुजरातमधून मोठ्या प्रमाणात गुटख्याची तस्करी केली जाते.
गुटख्याचा साठा करून त्याची अवैधरित्या विक्री होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर नवले यांना मिळाली. यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे भगवान कोळी यांनी खांडबारा येथील मुख्य बाजारपेठेतील संतोष किराणा दुकानावर छापा टाकला. यावेळी व्यापारी सुंदर भगवानदास दामेचा (रा.सिंधी कॉलनी, नंदुरबार) हा गुटख्याची विक्री करत असल्याचे निदर्शनास आले.
हेही वाचा : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर अवैध गुटख्याची वाहतूक; दोघांना अटक
यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने दुकानाच्या गोदामात तपासणी केल्यानंतर 4 लाख 34 हजारांचा गुटख्याचा साठा जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नवले, पोलीस उपनिरीक्षक भगवान कोळी, पोलीस हवालदार रवींद्र पाडवी, मोहन ढमढेरे यांनी संबंधित कारवाई केली आहे.