नंदुरबार - तब्बल एक वर्षानंतर जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा पार पडली, या सभेमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. दरम्यान यावेळी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना सदस्यांनी चांगलेच धारेवर धरले. सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांना अधिकाऱ्यांना समाधानकारक उत्तर न देता आल्याने, आमच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आल्याची संतप्त प्रतिक्रिया सदस्यांनी व्यक्त केली आहे.
तब्बल एक वर्षानंतर झाली सर्वसाधारण सभा
लॉकडाऊन आणि त्यानंतरच्या काळात देखील सर्वसाधारण सभा या ऑनलाई पद्धतीनेच घेतल्या जात होत्या, मात्र आज तब्बल एक वर्षानंतर जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा यहामोगी सभागृहात पार पडली. या सभेमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
अक्कलकुवा ग्रामपंचायत गैरव्यवहाराचा विषय गाजला
अक्कलकुवा ग्रामपंचायतीमधील गैरव्यवहाराच्या चौकशीचा अहवाल 5 महिन्यांपूर्वी सादर करण्यात आला होता. पण दोषींवर अद्यापही कारवाई झाली नसल्याची तक्रार यावेळी सदस्यांनी केली. दरम्यान याला उत्तर देताना अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ यांनी म्हटले आहे की, 4 कोटी 75 लाखांचा गैरव्यवहार ही गंभीर बाब असून, दोषींना पाठीशी घातले जाणार नाही. लवकरच प्रक्रिया पूर्ण करून, गैरव्यवहार करणाऱ्यांवर कारवाई करू.
सत्ताधाऱ्यांनी व्यक्त केला राग
तब्बल एक वर्षाच्या कालावधीनंतर सर्व साधारण सभा होत आहे. मात्र सदस्यांनी सभागृहात विचारलेल्या प्रश्नांना अधिकारी उत्तरे देत नसल्याने आता सदस्यांना आत्महत्या करावी लागेल, अशी संतप्त प्रतिक्रिया सत्ताधारी जि.प.सदस्य देवमन पवार यांनी दिली. त्यावर जि.प.अध्यक्षा अॅड. सिमा वळवी यांनी सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण्याच्या सूचना अधिकार्यांना केल्या.
विविध विषयांवर चर्चा
तीन ते चार वर्षे कर्मचार्यांचे मेडीकल बील प्रलंबित असल्याची तक्रार सभागृहात करण्यात आली. जि.प.अध्यक्ष सिमा वळवी यांनी मेडीकल बीलची प्रक्रिया एक ते दिड महिन्यात पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच जि.प.सदस्य भरत गावीत, राया मावची यांनी सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नावर अधिकारी समाधानकारक उत्तर देत नसल्याची तक्रार केली. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी सदस्यांच्या प्रश्नांवर समाधानकारक उत्तर देण्याचे सांगितले. तसेच अक्कलकुवा तालुक्यातील मौजे ओहवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र मुख्य इमारत दुरुस्तीला मंजुरी मिळण्याचा विषय सभागृहासमोर आला. त्यावर जि.प.सदस्यांनी आक्षेप घेत नवीनच असलेल्या ओहवा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या दुरुस्तीचा प्रश्न आला कुठून? असा सवाल उपस्थित केला. त्यावर प्रशासनाकडून सदर इमारत ताब्यात न घेण्यात आल्याने दुरुस्ती करावी लागणार असल्याचे सांगण्यात आले. यावर ओहवा प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीचे निकृष्ट काम करणार्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करण्याच्या सूचना जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिल्या आहेत.