नंदुरबार - नंदुरबार लोकसभा मतदारसंघात 29 एप्रिलला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. अतिदुर्गम भागातील मतदान केंद्रावर कर्मचाऱ्यांना बार्जने प्रवास करून जावे लागणार आहे. महाराष्ट्रातील पहिल्या मतदारसंघातील पहिले मतदान केंद्र हे नंदूरबार लोकसभा मतदार संघातील मणिबेली हे गाव आहे. या मतदान केंद्रावर नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांशी ईटीव्ही भारतने संवाद साधला आहे.
महाराष्ट्र राज्याच्या उत्तर टोकावर गुजरात राज्याच्या सीमेवरील सातपुडा पर्वतरांगांमध्ये मणिबेली हे गाव आहे, तिन्ही बाजूंनी सरदार सरोवराच्या जलाशयाने वेढलेले आहे. तर, एका बाजूने घनदाट जंगल आहे. मणिबेली येथे पोहोचण्यासाठी दिड तास जीपने रस्त्यावरून तर, दिड तास जलमार्गाने बोटीने प्रवास करावा लागतो. मनिबेली केंद्रावर नियुक्त असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये आनंदही आहे. तसेच अतिदुर्गम भागात जावे लागत असल्याने मनात थोडी शंकाही आहे. परंतु, प्रशासनाने योग्य नियोजन केल्यामुळे आम्हाला दिलेली जबाबदारी आम्ही योग्य पद्धतीने पार पाडू, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात मतदानाचा हक्क सर्व सामान्य नागरिकांना बजावता यावा यासाठी प्रशासन सुसज्ज झाले आहे. या निवडणुकीत माहिती व तंत्रज्ञानाचा उपयोग करून व्हीव्हीपॅट मशिनचा नव्यानेच उपयोग होणार आहे. त्यामुळे अतिदुर्गम भागातील मतदारालाही आपण दिलेले मत काही सेकंद दिसेल. त्याबद्दल अतिदुर्गम भागातील नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
महाराष्ट्रात लोकसभा मतदारसंघातील पहिल्या मणिबेली या मतदान केंद्रावर 161 पुरुष तर 165 महिला, असे एकूण 326 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. त्यासाठी मतदान अधिकारी व कर्मचारीवर्ग जिल्हा प्रशासनाने तसेच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी कामाला लागले आहेत.
अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील १२ मतदान केंद्रावर कर्मचारी बार्जने जाणार आहेत. मणिबेली, सिंदुरी, गमन, बामणी, जांगठी, डनेल व मुखडी या मतदान केंद्रावर कर्मचारी केवडीया कॉलनीहून बार्जने प्रवास करतील तर धडगाव तालुक्यातील सावऱ्या दिगर, उडद्या, भामणे, भांबरी या मतदान केंद्रावर जाण्यासाठी निवडणूक कर्मचारी भुशाहून बार्जने प्रवास करून मतदान केंद्रावर पोहोचतील.