नंदुरबार - तालुक्यातील रनाळे गावात असलेल्या बीएसएनएलच्या मोबाईल टॉवरला दुपारच्या सुमारास आग लागली. या आगीत संपूर्ण टॉवरवरील वायरींसह इतर साहित्य जळून खाक झाले आहे. टॉवरच्या मध्यभागापासून ते टोकापर्यंत आगीने रौद्ररुप धारण केले होते. शर्थीच्या प्रयत्नानंतर तीन तासांनी अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले.
रनाळे हे गाव नंदुरबार-दोंडाईच्या रस्त्यालगत आहे. या गावाच्या मध्यभागी भारतीय दूरसंचार निगमचे मोबाईल टॉवर आहे. बुधवारी दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास मोबाईल टॉवरला अचानक आग लागली. आग लागल्याचे समजताच परिसरातील नागरिकांनी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख दिपक गवते यांना माहिती दिली. यावेळी त्यांनी नंदुरबार नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला याबद्दल कळवले.
अग्निशमन बंब दाखल झाल्यावर तीन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांनी सायंकाळी सहाच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. या आगीत टॉवरवरील वायरी व इतर साहित्य जळून खाक झाल्याने नुकसान झाले आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.