नंदुरबार - जिल्ह्यात 87 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यापैकी तेवीस ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध झाल्या तर 64 ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले होते. मतमोजणीच्यावेळी नंदुरबार तालुक्यातील भादवड तर नवापूर तालुक्यातील वडखळ आंबी या ग्रामपंचायतीत दोघा उमेदवारांना समान मते मिळाल्याने ईश्वर चिठ्ठी काढून विजयी उमेदवाराची घोषणा करण्यात आली.
जिल्ह्यातील दोन ग्रामपंचायतींमधील उमेदवारांना समान मते
नंदुरबार तालुक्यातील भादवड ग्रामपंचायत निवडणुकीत योगेश राजपूत यांना 222 तर त्यांच्याविरोधात असलेल्या संजय राजपूत यांनाही 222 मते मिळाली. दोन्ही उमेदवारांना समान मते मिळाल्याने अखेर ईश्वर चिठ्ठी काढून विजयी उमेदवार घोषीत करण्याचा निर्णय निवडणूक अधिकाऱ्यांनी घेतला. यामध्ये योगेश राजपूत यांच्या नावाची चिठ्ठी निघाल्याने निवडणूक निरीक्षक चेतन गिरासे यांनी त्यांना विजयी घोषीत केले. तर दुसरीकडे नवापूर तालुक्यातील वडकळंबी गावात देखील अशीच घटना घडली. इथे देखील दोन उमेदवारांना समान मते मिळाली. रिता गावित आणि विनू गावित या उमेदवारांना समान मते मिळाली होती. ईश्वर चिठ्ठीमध्ये विनू गावित यांचे नाव निघाल्याने त्यांना निवडणूक निरीक्षक मंदार कुलकर्णी यांनी विजयी घोषित केले.