नंदुरबार - महाविकास आघाडीचे सरकार लोकांना मूर्ख बनवण्याचे काम करत आहे. जे विश्वासघाताने येतात ते विश्वासघातच करतात, अशी टीका माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच त्यांनी सरकारच्या शिवभोजनावर देखील सडकून टीका केली आहे. एका जिल्ह्यात फक्त 300 लोकांना जेवण मिळणार आहे. फक्त 12 ते 2 या कालावधीतच हे जेवण मिळणार आहे. त्यामुळे ठाकरे सरकार लोकांची फसवणूक करत आहे, असा आरोपही त्यांनी केला.
हेही वाचा - सत्तेसाठी लाचार शिवसेना सावरकरांच्या मुद्यावर गप्प का?
तळोदा तालुक्यातील बोरगाव येथे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक प्रचारार्थ देवेंद्र फडणवीस यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर टिका केली. या सभेला तालुक्यातील गटातील व गणातील उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवसेनेचा वाघ मांजर झाला
शिवसेनेचा वाघ कालपर्यंत मातोश्रीवरून डरकाळी फोडत होता. आता मात्र, त्यांची मांजर झाली असून तो म्याव-म्याव करत दिल्लीच्या मातोश्रींच्या दिशेने जात असल्याचे फडणवीस म्हणाले. निवडणुकांआधी भाजपासोबत युती करणाऱ्या शिवेसनेने जनतेचा विश्वासघात करत हे बेईमानीचे सरकार स्थापन केले. भारतातील राजकीय इतिहास पाहता हे बेईमानी करून आलेले सरकार 6 महिन्यांच्या वर टिकणार नाही, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला.
हेही वाचा - कोंबड्या चोरटे जेरबंद; वाहनासह सव्वा सात लाखांचा मुद्देमाल जप्त