नंदुरबार - जिल्ह्यातील आंबाबारी गावातील आंदोलक लोकसंघर्ष मोर्चाच्या नेतृत्वाखाली दिल्ली येथे आंदोलनासाठी गेलेल्या सीताबाई रामदास तडवी यांचा कडाक्याच्या थंडीमुळे मृत्यू झाला. या आंदोलनात कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन करत असताना मृत्युमुखी पडलेल्या राज्यातील त्या पहिल्या आंदोलक आहे. त्यांच्यावर मूळ गावी आंबाबारी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
दिल्लीतील आंदोलनात सहभाग
कृषी विषयक कायद्याच्या विरोधात नंदुरबार जिल्ह्यातील हजारो आंदोलक आंदोलनात सहभागी होण्यासाठी दिल्ली येथे गेले होते. सीताबाई आंदोलनात सहभागी होण्यासाठी दिल्ली येथे 15 जानेवारी रोजी निघाल्या होत्या. आज सकाळी गावात त्यांचा निधनाचा निरोप मिळाल्यानंतर गावावर शोककळा पसरली आहे. गावकऱ्यांनी त्यांना शहीदचा दर्जा देण्याची मागणी करत कृषी कायदे रद्द करण्याची मागणी केली आहे.
सीताबाई तडवी यांना 'शहीद'चा दर्जा देण्याची मागणी
दिल्ली येथे आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या सीताबाई तडवी या गेल्या अनेक वर्षांपासून लोकसंघर्ष मोर्चाच्या या आंदोलनात सहभागी आहेत. त्या प्रत्येक आंदोलनात सहभागी होत असतात. दिल्ली येथे सुरू असलेल्या कृषी विषयक कायद्याच्या विरोधातील आंदोलनात त्या सहभागी झाल्या होत्या व तेथे त्यांच्या दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यांना शहीद म्हणून घोषित करावे व शहीदचा दर्जा द्यावा, अशी मागणी आंबाबारी ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच यांनी केली आहे.
'कायदे रद्द न झाल्यास आंदोलन तीव्र'
सीताबाई या शेतकरी आहेत. 30 वर्षापूर्वी त्यांचे आंबाबारी गाव देहली प्रकल्पात गेल्यानंतर त्यांनी प्रकल्पग्रस्तांसाठी मोठा लढा देत गावकऱ्यांना योग्य पुनर्वसन शेतजमीन मिळण्याकरिता मोठे आंदोलन केले होते. सरकारविरोधी काळ्या कायद्याच्या विरोधात त्या आपल्या गावातील कार्यकर्त्यांसोबत दिल्ली येथे गेल्या होत्या. सरकारने काळे कायदे रद्द करावेत, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. हे कायदे रद्द झाले नाहीत, तर लढा तीव्र करून सीताबाईंची इच्छा पूर्ण करू, असा निर्धार तरुणांनी केला आहे.
'किती जणांचा बळी घेणार हा कायदा?'
माझी आई केंद्र सरकारच्या या काळ्या कायद्यांच्या विरोधातील आंदोलनात शहीद झाली असून किती आंदोलकांच्या मृत्यूची वाट सरकार पाहत आहे, असा संतप्त सवाल सीताबाई यांच्या मुलाने उपस्थित केला आहे.
मूळगावी अंत्यसंस्कार
सीताबाई यांच्यावर त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार असून आंदोलकांची भूमी म्हणून ओळख असलेल्या आंबाबारी गावावर शोककळा पसरली आहे. तर सरकारच्या काळ्या कायद्याविरोधात लढण्याचा निर्धार कायम आहे.