नंदुरबार - कृषी उत्पन्न बाजार समिती व भारतीय कापूस निगमने कापूस खरेदी सुरू केली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजीव गांधी कापूस खरेदी केंद्रावर कापूस खरेदीला सुरुवात झाली. परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कापूस विक्रीसाठी आणावा असे आवाहन बाजार समितीतर्फे करण्यात आले आहे.
चांगल्या प्रतीच्या कापसाला 5000 ते 5200 रुपये प्रति क्विंटलचा हमीभाव जाहीर करण्यात आला आहे. अवकाळी पावसामुळे कापूस ओला झाल्याने त्यातील आद्रतेचे प्रमाण अधिक आहे.त्यांमुळे पहिल्या दिवशी कापसाला 4000 ते 4400 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा दर मिळाला आहे. कापसातील आद्रतेचे प्रमाण 12 टक्के प्रमाणित आहे. मात्र कापसात ओलावा जास्त असल्याने दर कमी असल्याचे सांगण्यात आले आहे. बाजार समितीने कापसाची खरेदी सुरू केल्याने खासगी व्यापाऱ्यांकडून होणारी शेतकऱ्यांची लूट थांबणार आहे.
हेही वाचा - जळगावात शासकीय कापूस खरेदी केंद्रांची प्रतीक्षा; खासगी व्यापाऱ्यांमुळे शेतकरी हवालदिल
ओलावा जास्त असलेल्या कापसाला व्यापारी कवडीमोल भावाने खरेदी करतात. बाजार समितीचे परवानाधारक खरेदीदार व भारतीय कापूस निगम यांच्याद्वारे कापसाची खरेदी केली जाणार आहे. कापूस विक्रेत्या शेतकऱ्यांनी स्वच्छ आणि कोरडा कापूस विक्रीस आणावा असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती किशोर पाटील व सचिव योगेश अमृतकर यांनी केले आहे.