नंदुरबार - कोरोनामुळे जाहीर लागू केलेल्या संचारबंदीचा सर्वात मोठा फटका बसला जिल्ह्यातील पपई उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. पपई खरेदीसाठी व्यापारी येत नसल्याने पपईचे फळ झाडावर पिकून खराब होत आहे. त्यामुळे पपई काढून फेकण्याशिवाय शेतकऱ्यांसमोर पर्याय शिल्लक राहिला नाही.
नंदुरबार जिल्ह्यात जवळपास पाच हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर पपईची लागवड केली जाते. यंदा पपई काढणीच्या हंगामात उत्तर भारतातून व्यापारी पपई खरेदीसाठी येत असतात. मात्र, संचारबंदीमुळे व्यापारी आले नाहीत. काही व्यापाऱ्यांनी खरेदी बंद केल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. मोठ्या मेहनतीने उभ्या केलेल्या पपईच्या बागांमधून उत्पन्न मिळत नसल्याने शेतकरी हताश झाला असून, सरकारने पपई उत्पादक शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी पपई उत्पादकांनी केली आहे.