नंदुरबार - मिरचीच्या पिकावरील विषाणूजन्य रोगांवर नियंत्रण मिळत नसल्याने अखेर उमर्दे येथील शेतकरी रवींद्र चव्हाण यांनी जालीम उपाय शोधला आहे. पिकावरील विषाणूंवर चक्क देशी दारूची फवारणी करून त्यांनी कीटकनाशकांना पर्याय शोधलाय. यामध्ये ते काही प्रमाणात यशस्वी झाले आहेत.
राज्यातील मिरचीचे आगार म्हणून नंदुरबारची ओळख आहे. मागील पाच वर्षांपासून वातावरणातील बदलांमुळे मिरचीवर रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे उत्पनात घट होते. यावर्षी देखील जिल्ह्यात मिरचीवर मोठ्या प्रमाणात विषाणुजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाला आणि शेतकऱ्यांनी हजारों रुपये खर्च करून महागड्या कीटकनाशकांची फवारणी केली. मात्र फायदा होत नसल्याने त्यांनी आशा सोडली होती.
दारू नही... दवा है!
दारू अनेकांचा संसार उध्वस्त करते. मात्र दारूचा चांगला उपयोग देखील होऊ शकतो. रवींद्र चव्हाण यांनी 12 एकरांवरील मिरचीवर आलेल्या विषाणूजन्य रोगाचा सामना केला. मात्र, मिरचीवर दारू ही 'दवा' म्हणून वापरली आणि तिचे सकरात्मक परिमाण दिसून आले. यानंतर मिरचीची बाग पुन्हा बहरल्याचा दावा चव्हाण यांनी केला आहे.
महागडी औषधे, कीटकनाशके मारूनही उपयोग होत नसल्याने चव्हाण यांनी मिरची पिकावर प्रयोग करण्यास सुरुवात केली. त्यांनी चक्क देशी दारू फवारली. यानंतर पिकात सुधारणा झाल्याचा दावा त्यांनी केलाय. चव्हाण मिरची पिकावर देशी दारू व ताकाची फवारणी करत आहेत. त्यामुळे विषाणुजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. चव्हाण एका पंचीवीस लिटरच्या फवारणी पंपात एक बाटली म्हणजे 180 मिलीलीटर दारूचे मिश्रण टाकतात. एका पंपाला सुमारे 50 ते 60 रुपये खर्च येत असल्याचा दावा या शेतकऱ्याने केला आहे.
तज्ज्ञांचा मात्र विरोध
नंदुरबार येथील शेतकऱ्याने पिकांवर दारू फवारणीचा केलेला प्रयोग फायदेशीर नसल्याचं मत कृषीतज्ज्ञ डॉ.भगवान कापसे यांनी व्यक्त केलं आहे. त्यांनी औरंगाबादमधून या प्रकरणावर 'ईटीव्ही भारत'ला सविस्तर माहिती दिली. याआधी अशा अनेक चर्चा ऐकण्यात आल्या आहेत. मात्र त्या प्रयोगांना वैज्ञानिक आधार नाही, असे ते म्हणाले. याबाबत अनेक ठिकाणी संशोधन करण्यात आले. मात्र ठोस आधार किंवा परिणाम दिसला नसल्याचे कापसे यांनी सांगितले. त्यामुळे असे प्रयोग फायदेशीर नसल्याचा सल्ला त्यांनी दिलाय.