नंदुरबार - दत्त जयंतीच्या निमित्ताने सारंगखेड्यामध्ये भव्य अशी दत्ताची यात्रा आयोजित करण्यात येत असते. या यात्रेला शेकडो वर्षांची पंरपरा आहे. मात्र यंदा कोरोना महामारीमुळे ही यात्रा रद्द करण्यात आली आहे. यात्रा रद्द करण्यात आली असली तरी देखील दत्ताची जयंती पारंपरीक पद्धतीने साजरी करण्यात आली. मंदिरात सर्व पूजा विधीवत पार पडल्या. मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करून देण्यात आले होते. यावेळी भाविकांनी टप्प्या टप्प्याने कोरोनाचे सर्व नियम पाळून दत्ताचे दर्शन घेतले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकावेळी केवळ 50 भाविकांना मंदिरात सोडण्यात येत होते.
दत्त जयंतीनिमित्त विधीवत पूजन
दत्त जयंतीनिमित्त सारंगखेडा येथे मंदिर प्रशासनाच्यावतीने विधिवत पूजन करून 56 भोगांचे नैवेद्य दाखविण्यात आले. त्यानंतर सकाळी महाआरती झाल्यानंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिर प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली. शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करत भाविकांनी दर्शन घेतले.
दत्त जयंतीनिमित्त भाविकांनी फेडले नवस
सारंगखेडा येथे दत्तजयंती निमित्त नवस फेडण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करून भाविकांनी आपल्या नवसाची पूर्ती केली, यावेळी भाविकांच्या वतीने केळीची तुला, साखरेची तुला, फळांची तुला अशा विविध तुला करण्यात आल्या. मंदिर समितीच्या वतीने येणाऱ्या भाविकांसाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वयंचलित सॅनीटायझर फवारणी मशीन बसवण्यात आल्या होत्या.
मंदिर परिसरात जयंतीनिमित्त रोषणाई
दत्तजयंती निमित्त मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. सर्व परिसराची स्वच्छता करून, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून भाविकांना गाभाऱ्यात न जाता सभामंडपातून दर्शन घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. तसेच मंदिरात किंवा मंदिर परिसरात भाविक गर्दी करणार नाही याची देखील विशेष दक्षता घेण्यात आली होती.