नंदुरबार - शहरातुन शिवजयंतीची मिरवणुक काढणाऱ्या सर्व मंडळावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यासाठी शहरातुन तब्बल सात मंडळांनी शिवजयंतीची मिरवणुक काढली होती. यात डीजेचा आवाज तीव्र झाल्याने सार्वजनिक शांतता भंग करणे, त्यामुळे शालांन्त परिक्षेच्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोका निर्माण करणे, अशा प्रकाराच्या आरोपांचा ठपका ठेवण्यात आला आहे. तर काही मंडळांवर तीन स्पिकर लावुन मिरवणुक काढण्यास मज्जाव केल्याने पोलिसांसोबत हुज्जत घालण्याचा आरोप देखील करण्यात आला आहे.
शहरात डीजे साऊंड वाद्याच्या तीव्रतेची क्षमता कायद्याने निश्चित असतानाही काढलेल्या मिरवणूकीवेळी तीव्रतेपेक्षा जास्त प्रमाणात डीजे वाद्य वाजवून शांतता भंग करणार्या शहरातील सहा व्यायाम शाळांच्या अध्यक्षांसह डीजे मालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शहरात शिवजयंतीनिमित्त मिरवणूका काढण्यात आल्या होत्या. या मिरवणूकीत विविध व्यायामशाळांनी डीजे साऊंड वाद्य लावले होते. कायद्याने डीजे साऊंड वाद्याच्या आवाजाची तीव्रता ठरवून दिलेली आहे. असे असतानाही मिरवणूकीत डीजे साऊंड वाद्याची तीव्रतेपेक्षा जास्त प्रमाणात असल्याने सार्वजनिक शांततेचा भंग झाला. तसेच नागरीकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला.
हेही वाचा - कोकणीपाड्यात दुकानाला अचानक लागली भीषण आग, पाच लाखांचे नुकसान
ट्रॅक्टरवर तीन साऊंड सिस्टीम लावण्यास मनाई करण्यास गेलेल्या पोलीस कर्मचार्यांशी मारुती व्यायाम शाळेचे अध्यक्ष गिरीष पावबा मराठे, नवजीवन व्यायाम शाळेचे अध्यक्ष अनिल रमेश परदेशी, दादा गणपती मंडळाचे अध्यक्ष योगेश अरुण सोनार, वीर छत्रपती ब्रिगेड मंडळाचे अध्यक्ष खुशाल जगदीश चौधरी यांनी हुज्जत घातली. याबाबत पोलीस निरिक्षक सुनिल बिर्हाडे, सहायक पोलीस निरिक्षक सुभाष ठाकरे, सहायक पोलीस निरिक्षक राजेंद्र बिर्हाडे, पोलीस हवोलदोर रवींद्र पवार, गणेश धनगर, पोलीस नाईक दीपक गावित यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या तक्रारी दिल्या आहेत. त्यानुसार वीर भगतसिंग व्यायाम शाळेचे अध्यक्ष संदीप दिलीप चौधरी यांच्यासह डीजे साऊंडचे मालक रिंकु गोसावी, ऑपरेटर भूषण पाटील, रोकडेश्वर हनुमान व्यायाम शाळेचे अध्यक्ष दीपक रमण शिंदे आणि डीजे मालक, मारुती व्यायाम शाळेचे अध्यक्ष गिरीष पावबा मराठे, नवजीवन व्यायाम शाळेचे अध्यक्ष अनिल रमेश परदेशी, दादा गणपती मंडळाचे अध्यक्ष योगेश अरुण सोनार, वीर छत्रपती ब्रिगेड मंडळाचे अध्यक्ष खुशाल जगदिश चौधरी यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.