नंदुरबार - राज्यात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीचा प्रयोग करण्यात आला. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. मात्र, मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या नंदुरबार जिल्ह्यात पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काही ठिकाणी एकत्र आल्याचे चित्र उमेदवारी अर्जांच्या छाननीनंतर स्पष्ट झाले आहे.
हेही वाचा - सुधारित नागरिकत्व कायदा रद्द करावा या मागणीसाठी सर्वधर्मीय नागरिकांनी केले उपोषण
नवापूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या १० गटासाठी आणि पंचायत समितीच्या २० गणासाठी भाजप व राष्ट्रवादीचा ५०-५० टक्क्यांचा फॉर्म्युला ठरवण्यात आला आहे. काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांच्या कुटुंबीयांनी आणि नातेवाईकांनी भाजपची उमेदवारी केल्याचे छाननीनंतर समोर आले आहे. भाजप, राष्ट्रवादीच्या आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राज्यस्तरीय नेते येतील का? राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याचे निरीक्षक आणि पक्ष प्रवक्ते उमेश पाटील यांच्या परवानगीने ही आघाडी झाल्याचे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे.
पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या या भूमिकेविरोधात नंदुरबार जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भूमिका घेत असतील तर त्यांच्यावर कारवाई होईल का? असा प्रश्न सर्वसामान्य कार्यकर्ते उपस्थित करत आहेत. तर, दुसरीकडे राज्यात महाविकास आघाडी स्थापन केली आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेत व पंचायत समिती निवडणुकीमध्ये तो फॉर्म्युला आमलात आणला जाईल, असे चित्र दिसत होते. परंतु, छाननीनंतर देखील महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी वेगवेगळे एबी फॉर्म जोडले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात काही ठिकाणी तिरंगी व चौरंगी लढत होताना दिसून येत आहे.