नंदुरबार -नवापूर तालुक्यात काही दिवसापूर्वी अचानक मृत कोंबड्या आढळल्या होत्या. या मृत कोंबड्यांचे नमुने भोपळा येथे तपासणीसाठी पाठवले होते. या कोंबड्यांचा मृत्यू 'बर्ड फ्ल्यू'ने होत असल्याचे स्पष्ट झाले. यामुळे कुक्कुटपालन व्यवसायिकांचे करोडो रुपयांचे नुकसान होणार होणार असून व्यवसाय ठप्प होणार की काय? अशी भिती निर्माण झाली आहे.
नऊ लाख पक्षांची शास्रोक्त पद्धतीने विल्हेवाट
नवापूर तालुक्यातील २६ पोल्ट्री फार्ममध्ये साधारण नऊ लाख पक्षी आहेत. या सर्व पक्षांची शास्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. पक्षांचे खाद्य मोठया प्रमाणावर कुक्कुटपालन व्यवसायिकांनी साठवून ठेवले असते. त्याची पूर्णपणे विल्हेवाट लावावी लागेल. सर्वच पोल्ट्री फार्मवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोल्ट्री फार्मचे अंडी, चिकन, पक्षी, पशुखाद्य आदी साहित्य पोल्ट्री फार्मच्या बाहेर जाणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे.
शंभर पथकांना प्राचारण
नवापूर शहरातील बर्डफ्लु नियंत्रणासाठी पशुसंवर्धन विभागाचे नाशिक, नगर, धुळे, जळगांव आदी ठिकाणाहून शंभर पथकांना प्राचारण करण्यात आले आहे. पोलीस बंदोबस्तासाठी साठ पोलीस कर्मचारी व वीस महिला कर्मचाऱ्यांना प्राचारण करण्यात आले आहे.