नांदेड- तरुणीचा विनयभंग करून तिची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्याचबरोबर आरोपीने तरुणीकडून लग्नासाठी २ लाख ८० हजार रुपये घेतले होते ते देखील त्याने परत केले नाही. त्यामुळे या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
तरुणीचा विवाह धनेगावमधील देवानंद बेंडके याच्यासोबत करण्याचे ठरले होते. यासाठी ५ लाख रुपये हुंडा ठरविण्यात आला होता. त्यापैकी २ लाख ८० हजार रुपये वरमंडळीने अगोदरच घेतले होते. त्यानंतर देवानंद याने विवाह ठरलेल्या तरुणीस कौठ्यातील गोदावरी नदीकाठी बोलावले व तेथे तिचा विनयभंग केला. यावेळी आरोपीने मोबाईलद्वारे चित्रीकरण करून घेतले.
दरम्यान, सदर तरुणी व तिची आई देवानंदच्या घरी गेले असता देवानंद बेंडके, शिवराज बेंडके व कावेरी बेंडके यांनी त्यांच्यासोबत वाद घालून लग्नास नकार दिला. त्यावेळी मुलीने हुंड्याच्या पैशांची मागणी केली. मात्र त्यांना चप्पल बुटाने मारहाण करून तू आमच्या विरोधात तक्रार दिल्यास मोबाईलद्वारे केलेले चित्रीकरण सर्वांना दाखविल, अशी धमकी देण्यात आली. या प्रकरणी तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून नांदेड ग्रामीण पोलिसांनी उपरोक्त तिघांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास आर.एम.घोळवे करीत आहेत.