नांदेड - कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या पत्रकारांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करण्यात येतील, असा विश्वास भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष तथा डॉ. खा. विनय सहस्त्रबुद्धे यांनी व्यक्त केला. दर्पण दिनाचे औचित्य साधून खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वतीने पत्रकार सन्मान सोहळा आयोजित केला होता. त्यात सहस्त्रबुद्धे बोलत होते.
रचनात्मक पत्रकारिता काळाची गरज
ते म्हणाले की, बदलती आव्हाने पेलण्यासाठी पत्रकारांनी सज्ज राहण्याची गरज आहे. चांगला बदल सगळ्यांसाठी महत्वाचा असतो. खरे तर कामगार कपातीमुळे रोजगार बुडाला म्हणून हताश होण्याची गरज नाही. तर पत्रकारिता प्रगल्भ करण्याची गरज आहे. रचनात्मक पत्रकारिता काळाची गरज आहे. बदल समजापुढे आला पाहिजे. बातमीच्या जुन्या व्याख्यांमध्ये न आडकता सकारात्मकता असणारी बातमी लोकांपुढे आली पाहिजे. निराशाजनक पत्रकारिता कमी होणे आवश्यक आहे.
नांदेड पत्रकार सन्मान सोहळा सकारात्मक बातम्यांना अधिक प्राधान्य देणेलोकहिताच्या बातम्यांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. चवीने वाचणाऱ्या बातम्या जरूर लिहाव्यात पण सकारात्मक बातम्यांना अधिक प्राधान्य देणे आवश्यक आहे. लोकांची अभिरुची विकसित झाली आहे. त्यामुळे या अनुषंगाने विचार करण्याची गरज आहे.
बातम्या वस्तुनिष्ठ असाव्यावृत्त आणि विचार यात भेसळ झाली आहे. त्यामुळे अग्रलेखातून आपले विचार व्यक्त व्हावेत. पण बातमीत विचार येणे ही बाब घातक आहे. बातम्या राजकीय भूमिकेशी नसाव्यात तर त्या वस्तुनिष्ठ असाव्यात. बातम्या निष्पक्ष असायला हव्या. बातम्यांची विश्वसनीयता कमी होत चालली आहे. ही बाब चिंताजनक आहे. त्यामुळे काळानुसार बदल करण्याची गरज आहे, असेही डॉ. खा. विनय सहस्त्रबुद्धे म्हणाले. प्रस्ताविक खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले तर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन व्यंकटेश चौधरी यांनी केले.पत्रकार सन्मान सोहळ्यास नांदेड जिल्ह्यात पत्रकार बहु संख्येने उपस्थित होते. यावेळी माध्यम तज्ञ डॉ. समिरण वाळवेकर, खा. प्रतापराव पाटील चिखलीकर, माजी मंत्री माधवराव पाटील किन्हाळकर, आ. राम पाटील रातोळीकर, भाजपचे जिल्हा अध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगांवकर, महानगर अध्यक्ष प्रवीण साले, माजी आ. अविनाश घाटे यावेळी उपस्थित होते.
हेही वाचा - मुंबई दहशतवादी हल्ल्याप्रकरणी पाकने लख्वीला जबाबदार धरावं - अमेरिका