नांदेड - व्हॅलेंटाईन डेची वाट तरुणाई आतुरतेने पाहत असते. या दिवशी विशेष महत्व असते, ते गुलाबाचे. गुलाब हे तरुणाईसाठी प्रेम व्यक्त करण्याचे माध्यम आहे. नांदेडमधील एका शेतकऱ्याने प्रेमाचे हे प्रतिक आपल्या शेतात फुलवले आहे. तरुणाईच्या विशेष क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी हे गुलाब सज्ज झाले आहेत. त्यामुळे तरुणाईसोबतच या शेतकऱयासाठीही व्हॅलेंटाईन डे महत्वाचा विशेष आहे.
नांदेड जिल्ह्यातील शेतकरी शेतीत विविध प्रयोग करत आहेत. पारंपरिक शेतीसोबत फुल शेती करून उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. दाभड येथील दिलीप टेकाळे हे अशाच शेतकऱयांपैकी आहेत. त्यांच्या शेतात पाण्याची कमतरता होती. त्यामुळे पाण्यावरची पीके घेण्यास अडचण येत होती. पण, टेकाळे या परिस्थितीला शरण गेले नाहीत, तर तिचे रुपांतर त्यांनी संधीत केले. आपल्या शेतात त्यांनी गुलाब फुलवण्याचे ठरवले. आज ही गुलाब शेती चांगलीच फुलली असून, व्हॅलेंटाईन डेची शोभा वाढविण्यासाठी ते सज्ज झाले आहेत.
दिलीप टेकाळे यांची वडिलोपार्जित आहे. त्यामुळे त्यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला. आपल्या शेतात ते नेहमीच निरनिराळे प्रयोग करत असतात. शेतीत कोणकोणती पीके घेता येतील याविषयी त्यांनी माहिती घेतली. तसेच, खते देणे, कीडनाशक फवारणी, छाटणी रोग - किडी आदीबाबत माहिती घेतली. याबद्दलचे त्यांचे ज्ञान वाढल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. आज त्यांच्या प्रयत्नांचे परिणाम शेतात दिसत आहेत.
परिसरातील लोक गुलाबवाला, फुल शेतीवाला टेकाळे म्हणून त्यांना ओळखत आहेत. तसेच, त्यांच्याकडे माहिती घेण्यासाठीही येत आहेत. व्हलेंटाइन डे निमित्त गुलाबाच्या फुलांना खूप मोठी मागणी असते. ही मागणी लक्षात घेऊन आम्ही दोन महिन्यापासून तयारी करीत असतो. लांब - लांब दांडी असलेल्या गुलाब फुलांना खूप मागणी असते. ही मागणी लक्षात घेऊन पुरवठा करण्यात येतो. भावही चांगला मिळतो, अशी माहिती टेकाळे यांनी दिली.