नांदेड - शहरालगत असलेल्या बाळापूर येथील तलावात दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गुरुकुल विद्यालयातील नववीच्या वर्गामध्ये शिकणारी चार मुले शाळेतून दुपारच्या सुट्टीत बाळापूर येथील तलावात पोहायला गेले होते. या चार मुलांपैकी दोन मुलांचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे. लखन सिद्धपा राचेवाड आणि साईचरण किशन आल्लूरोड या १४ वर्षीय दोन मुलांचा मृत्यू झाला.
हेही वाचा - निर्भया प्रकरण : अखेर वेळ ठरली... दोषींना 3 मार्चला फाशी
ज्या तलावामध्ये मुलं बुडाली त्यात एका वर्षापूर्वी बेसुमार अवैध उत्खनन झाले होते. तलावाची खोली वाढल्याने मुलांचा बळी गेला असल्याचा आरोप गावकरी करत आहेत. या घटनेमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनास्थळी पोलीस निरीक्षक सोहन माच्छरे आणि त्यांचे सहकाऱ्यांनी गावकरी आणि नातेवाईकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. बुडालेल्या विद्यार्थ्यांना काढण्यासाठी पोलीस जमादार स्वामी, बालाजी संमबेटवर, किसन पवार, राजू कणकंवार, श्याम पांचाळ, लक्षण डबेकर कृष्णा सोळंके, सायलू रुमोड आणि गंगाधर सोडूलवर यांनी पाण्यात उतरुन शोध घेत दोनही मृतदेह बाहेर काढले. या प्रकरणाचा तपास धर्माबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक करीत आहेत.
हेही वाचा - मेरी जान 'तिरंगा' है! राष्ट्रध्वजाच्या सन्मानासाठी 'त्याने' लावली जीवाची बाजी