नांदेड - कामावर असताना उलटीचा त्रास झाल्याने एका ट्रॅकमनचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. रेल्वे रुग्णालयातून एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना त्याचा मृत्यू झाला होता. मात्र, रेल्वे रुग्णालयात डॉक्टर वेळेत उपलब्ध न झाल्यानेच त्याचा मृत्यू झाला, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. राजशेखर राव (वय २४ रा. करनुल) असे मृत्यू झालेल्या ट्रॅकमनचे नाव आहे.
राजशेखर राव हे दक्षिण-मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात ट्रॅकमन म्हणून कार्यरत होते. नांदेड ते लिंबगाव दरम्यान, रेल्वे फलक क्रमांक ३४१/६-७ येथे ट्रॅकवरील गिट्टी लेव्हलिंगचे काम करण्यासाठी ट्रॅकमनचे एक पथक मुकादमाच्या अधिपत्याखाली मंगळवारी गेले होते. वरिष्ठ अधिकारी पाहणीसाठी येणार असल्याने सकाळपासून कामगार काम करत होते. उन्हाळ्याचे दिवस असल्याने भरदुपारी अंग मेहनतीचे काम उन्हात करवून घेऊ नये, असे सर्वसाधारण निकष आहेत. मात्र, अधिकारी येणार असल्याने मजूर काम करत होते. दरम्यान, दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास राजशेखर राव हे चक्कर येऊन पडले. पाणी दिले असता उलटी झाली. तेव्हा त्यांना सहकाऱ्यांनी वाहनाने नांदेड येथील रेल्वे रुग्णालयात दाखल केले.
त्यावेळी रेल्वे रुग्णालयात कोणतेही डॉक्टर उपलब्ध नव्हते, त्या ठिकाणी हजर असलेल्या आरोग्य सेविका पल्लवी यांनी डॉ. भाऊसाहेब कोल्हे यांना फोनवरून माहिती दिली असता, डॉक्टरांनी औषधे सांगितली. औषध दिल्यानंतरही राजशेखर राव यांच्या प्रकृतीतीत बरी झाली नाही. त्यामुळे शेवटी आरोग्य सेविकेने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यासाठी पाठवले तेव्हा राव यांचा रुग्णालयात दाखल करण्याआधीच मृत्यू झाला.
दरम्यान, राजशेखर राव यांच्या मृत्यूला डॉ. भाऊसाहेब कोल्हे हे जबाबदार असून त्यांना निलंबित करावे, अशी मागणी रेल्वे कर्मचाऱ्यांनी केली आहे. या प्रकाराविषयी येथील मुख्य वैद्यकीय अधीक्षक यांना विचारले असता मृत्यू उष्मांघाताने झाल्याचे सांगत त्यांनी बोलण्यास नकार दिला. या वेळी मृतांचे नातेवाईक आणि कर्मचारी रेल्वे रुग्णालयातील डॉक्टरांच्या विरोधात घोषणाबाजी केली. कर्तव्यावर गैरहजर असलेल्या संबंधित डॉक्टरावर कारवाई करून त्याला निलंबित करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.